coronavirus: कल्याण डोंबिवलीत 12 नंतर कडकडीत बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 02:56 PM2021-04-06T14:56:31+5:302021-04-06T14:57:01+5:30
Kalyan-Dombivali News : कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येनंतर राज्य सरकारने नवीन निर्बंध लागू केले आहेत. कल्याण डोंबिवलीतही सोमवारपासून या आदेशाच्या अंमलबजावणीला सुरवात झाली. मात्र मंगळवारी अनेक व्यापा-यांनी आपली दुकानं सुरु ठेवली होती.
कल्याण - कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येनंतर राज्य सरकारने नवीन निर्बंध लागू केले आहेत. कल्याणडोंबिवलीतही सोमवारपासून या आदेशाच्या अंमलबजावणीला सुरवात झाली. मात्र मंगळवारी अनेक व्यापा-यांनी आपली दुकानं सुरु ठेवली होती. दुकाने फक्त शनिवार , रविवार बंद ठेवायची का? इतर दिवशी रात्री 8 पर्यंतच दुकाने सुरू राहतील का? असे एक ना अनेक प्रश्न दुकानदारांमधून उपस्थित केले जात होते. मात्र पालिकेच्या पथकांनी नियम स्पष्ट केल्यावर कल्याण डोंबिवलीत बारा नंतर कडकडीत बंद पाहायला मिळाला. मात्र हे निर्बंध घालताना शासकीय स्तरावर कोणत्याही प्रकारची सुस्पष्टता नसल्याने कल्याण डोंबिवलीतील व्यापारी वर्गात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
राज्य सरकारकडून निर्बंध जाहीर करताना शनिवार व रविवार पूर्णपणे बंद (विकेंड लॉकडाऊन) आणि आठवड्याचे इतर दिवस नियमानुसार दुकाने सुरू ठेवण्याचे तोंडी सांगण्यात आले. मात्र ज्यावेळी लेखी आदेश (जीआर) निघाले त्यांनी मात्र व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. अशातच केडीएमसी प्रशासनाकडूनही राज्य शासनाच्या आदेशानुसार मग सोमवारी रात्री नविन कोवीड निर्बंध जाहीर करण्यात आले. त्यातही राज्य शासनाच्याच आदेशांची 'री' ओढण्यात आल्याने कल्याण डोंबिवलीकरांच्या संभ्रमात आणखीनच भर पडली. 'आठवड्यातील सोमवार ते शुक्रवारपर्यंत सर्व दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी तर शनिवारी आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी' असा काहीसा व्यापारी आणि नागरिकांचा समज झाला होता.