coronavirus: केडीएमसी हद्दीत लसीकरण केंद्रे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा, श्रीकांत शिंदे यांची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 05:57 AM2021-03-31T05:57:25+5:302021-03-31T05:58:11+5:30
coronavirus in KDMC : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत कोरोना रुग्ण वाढत असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना लसीकरण केंद्रे आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवा, अशी मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत कोरोना रुग्ण वाढत असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना लसीकरण केंद्रे आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवा, अशी मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात खासदारांनी आयुक्तांसोबत बैठक घेतली. या वेळी भाजप आमदार रवींद्र चव्हाणही उपस्थित होते.
आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीस शिवसेनेचे पदाधिकारी विश्वनाथ राणे, दीपेश म्हात्रे, राजेश मोरे, विजय साळवी, मनोज चौधरी आदी उपस्थित होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, या विषयावर आयुक्तांसोबत शिंदे यांनी चर्चा केली.
सध्या मनपा हद्दीत बेड किती उपलब्ध आहे, त्याचा आढावा घेण्यात आला. वाढती रुग्णसंख्या पाहता आणखी बेड लागू शकतात. त्याचबरोबर आर्ट गॅलरी आणि पाटीदार भवनसारखे कोविड सेंटर उभारण्याची गरज भासू शकते. केंद्राकडून राज्याला कोरोना लसीचा साठा कमी मिळत आहे. ही बाब लोकसभा अधिवेशनात खासदारांनी उपस्थित केली होती. लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होताच लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी लसीकरणासाठी आणखी केंद्रे वाढविता येऊ शकतात. लसीचा पुरेसा साठा महाराष्ट्रासह ठाणे जिल्ह्यास उपलब्ध झाल्यास लसीकरणाचा वेग वाढविता येणार आहे. या गोष्टी लक्षात घेता आयुक्तांनी मनपा हद्दीत कोरोना लसीकरणाची केंद्रे वाढवावीत. त्याचबरोबर कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाणही वाढवावे, याकडे लक्ष वेधले आहे.
आरोग्य सुविधांवर भर द्या : चव्हाण
चव्हाण यांनी सांगितले की, कोराना लसीकरण केंद्रे वाढवावीत, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात यावे. त्यासाठी २०० जणांचा कर्मचारी वर्ग लागणार आहे. त्यासाठी तजवीज करून कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य सोयीसुविधा वाढवाव्यात, याकडे प्रशासनाने लक्ष वेधले आहे.