Coronavirus : पीपीई कीट घालून उपचार करताना आम्ही होतो घामाघूम, डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉयची व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 02:08 AM2021-04-03T02:08:19+5:302021-04-03T02:11:37+5:30
Coronavirus : कोरोना हा अतिसंसर्गजन्य आजार असल्याने रुग्णांवर उपचार करताना, चाचणी घेताना वैद्यकीय डॉक्टर, नर्स, वार्डबॉय, रुग्णवाहिकेतील सेवक, कर्मचारी यांना पीपीई कीट घालून राहावे लागते. तरच त्यांना रुग्णांना हाताळणे, त्यांच्यावर उपचार करणे, त्यांच्या वार्डमध्ये वावरणे शक्य आहे.
- मुरलीधर भवार
कल्याण : कोरोना हा अतिसंसर्गजन्य आजार असल्याने रुग्णांवर उपचार करताना, चाचणी घेताना वैद्यकीय डॉक्टर, नर्स, वार्डबॉय, रुग्णवाहिकेतील सेवक, कर्मचारी यांना पीपीई कीट घालून राहावे लागते. तरच त्यांना रुग्णांना हाताळणे, त्यांच्यावर उपचार करणे, त्यांच्या वार्डमध्ये वावरणे शक्य आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर सुरुवातीच्या काळात गतवर्षी पीपीई कीट काही सामाजिक संस्थांकडून डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी वर्गास पुरविला जात होते. त्यामुळे पीपीई कीटला बाजारात जास्त मागणी होती.
एक पीपीई कीट किमान ८०० रुपयांना मिळते. यापूर्वी सुरुवातीला पीपीई कीटची किंमत जास्त होती. १२०० रुपयांपर्यंत पीपीई कीट बाजारात विकले गेले. महापालिकेच्या रुग्णालयात पीपीई कीट महापालिका प्रशासनाकडून पुरविले जातात. तर, खासगी कोविड रुग्णालयांत रुग्णालय व्यवस्थापनाकडून पीपीई कीट पुरविले जातात. मागच्या वर्षीच्या तुलनेत सध्या चांगल्या प्रतीचे पीपीई कीट बाजारात उपलब्ध आहेत. एकदा वापर केल्यावर दुसऱ्या वेळेस त्याचा वापर करता येत नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयात कोरोनाचे उपचार घेणाऱ्यांना रुग्णांच्या बिलात पीपीई कीटचा खर्च समाविष्ट केला जातो. हे सगळे असले तरी आठ तास पीपीई कीट घालून सेवा देणाऱ्यांची चांगलीच दमछाक होते.
चांगल्या दर्जाचे कीट बाजारात
रुग्णाला आणून रुग्णालयात भरती करताना रुग्णवाहिकेत ॲटेंडंटचे मी काम करतो. सध्या उन्हाळा आहे. आमची रुग्णवाहिका वातानुकूलित नाही. त्यामुळे पीपीई कीट घालून उन्हातून रुग्णाला रुग्णालयात नेताना घामाघूम होऊन जातो.
मी खासगी रुग्णालयात नर्सचे काम करते. सुरुवातीला आलेले पीपीई कीट हे जास्त दर्जेदार नव्हते. आता चांगल्या दर्जाचे कीट बाजारात आले आहेत. त्यामुळे इतका त्रास जाणवत नसला तरी एक कोंडलेपण सातत्याने जाणवत राहते.
सध्या उन्हाळा आहे. कोविड वाॅर्डमध्ये पीपीई कीट घालून वैद्यकीय सेवा देताना घामाघूम होतो. सतत पीपीई कीट घातल्याने डीहायड्रेशनचा त्रास काही जणांना झालेला आहे.
कीटसंदर्भात गंभीर तक्रारी आलेल्या नाहीत
पीपीई कीट महापालिकेच्या रुग्णालयात महापालिकेकडून पुरविले जाते. पीपीई कीट घालून सेवा देताना काहीअंशी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्रास होतो. मात्र, संसर्गापासून वाचण्यासाठी कर्तव्य बजावत असताना पीपीई कीट घालण्याशिवाय पर्याय नाही. कीटसंदर्भात गंभीर स्वरूपाच्या तक्रारी अद्याप तरी आलेल्या नाहीत. - डॉ. अश्विनी पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी, केडीएमसी