स्मशानभूमीतील तोडलेल्या संरक्षक भिंतीकडे मनपाचे दुर्लक्ष; ‘आप’तर्फे स्वखर्चाने बांधकाम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 11:50 PM2021-01-29T23:50:31+5:302021-01-29T23:50:46+5:30
स्मशानभूमीला संरक्षक भिंत नसल्याने तेथे भटके कुत्रे, जनावरे घुसून दफन केलेल्या मृत बालकांच्या शरीराची विटंबना करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कल्याण : शौचालयाच्या बांधकामासाठी पूर्वेतील विठ्ठलवाडी स्मशानभूमीची तोडलेली संरक्षक भिंत दहा दिवसांत बांधावी, अन्यथा स्वखर्चाने संबंधित बांधकाम केले जाईल, असे पत्र आम आदमी पक्षाने केडीएमसीला दिले होते. परंतु, महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने शुक्रवारी ‘आप’ने भिंतीच्या कामाला सुरुवात केली.
विठ्ठलवाडी स्मशानभूमीच्या आवारात शौचालय बांधण्याचे काम संरक्षक भिंत तोडून सुरू करण्यात आले होते. शौचालय उभारणीला ‘आप’सह अन्य सामाजिक संघटनांनी विरोध केल्याने संबंधित बांधकाम उभे राहू शकले नाही. बांधकाम थांबले परंतु दोन महिने उलटूनही स्मशानभूमीची तोडलेली संरक्षक भिंत नव्याने बांधण्यात आली नाही. ती तशीच तुटलेल्या अवस्थेत ठेवण्यात आली.
स्मशानभूमीला संरक्षक भिंत नसल्याने तेथे भटके कुत्रे, जनावरे घुसून दफन केलेल्या मृत बालकांच्या शरीराची विटंबना करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावर येत्या १० दिवसांत संरक्षक भिंत बांधावी, अन्यथा स्वत:च्या खर्चाने नव्याने भिंत बांधण्यात येईल, असे पत्र ‘आप’चे कल्याण-डोंबिवली महानगराध्यक्ष धनंजय जोगदंड यांनी महापालिकेला दिले होते. त्या पत्राला गुरुवारी दहा दिवसांचा कालावधी लोटल्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. परंतु, त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेर ‘आप’ने शुक्रवारी नव्याने भिंत बांधण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय भोसले यांनी या कामासाठी बांधकाम साहित्य पुरविल्याची माहिती जोगदंड यांनी दिली.