रात्रभर " ती " पाण्यात हुडहुडली ,अखेर ......
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 02:52 PM2021-09-01T14:52:21+5:302021-09-01T14:53:21+5:30
कल्याणात चेंबरमध्ये पडलेल्या तीन कुत्र्यांच्या पिल्लांचा जीव केडीएमसीच्या फायर ब्रिगेडने वाचवला होता. आता पुन्हा एकदा फायर ब्रिगेडच्या जवानांनी माणुसकीचं दर्शन दाखवून आणखी एका मुक्या प्राण्याला जीवनदान दिलं आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याणात चेंबरमध्ये पडलेल्या तीन कुत्र्यांच्या पिल्लांचा जीव केडीएमसीच्या फायर ब्रिगेडने वाचवला होता. आता पुन्हा एकदा फायर ब्रिगेडच्या जवानांनी माणुसकीचं दर्शन दाखवून आणखी एका मुक्या प्राण्याला जीवनदान दिलं आहे. कल्याण मधील सह्याद्री नगर परिसरात एक गाय चेंबरमध्ये अडकली होती. याबाबतची माहिती रहिवाशांनी मंगळवारी संध्याकाळी फायर ब्रिगेडला दिली आणि क्षणाचाही विलंब न करता फायर ब्रिगेडचे जवान घटनास्थळी दाखल झाले. रात्रभर ड्रेनेजच्या पाण्यात राहिल्यामुळे गाय थंडीने हुडहुडत होती. त्यामुळे जवानांनी गरम पाण्याने गाईला आंघोळ घातली. हे सर्व दृश्य पाहून उपस्थिताचं देखील मन भरून आलं.
सोमवारपासून दशरथ तावरे यांच्या मालकीची गाय हरवली होती. मात्र ही गाय चेंबरमध्ये पडल्याने तिचा शोध लागत नव्हता. याबाबतची माहिती मिळताच प्रयत्नांची शिकस्त करत आणि आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावत चेंबरमध्ये अडकलेल्या गाईला बाहेर काढण्यात जवानांना यश आलं. रात्रभर चेंबर मध्ये असल्याने तिला बाहेर येण्यास त्रास होत होता, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली. चिखलात माखल्यामुळे तसेच रात्रभर पाण्यात राहून थंडीमुळे गाईला चांगलीच हुडहुडी भरलेली.तिला बरं वाटावं म्हणून जवानांनी मोठ्या मायेनं गरम पाण्यांन आंघोळ देखील घातली. हा सर्व प्रकार दशरथ तावरे यांना माहीत पडल्यावर त्यांनी देखील आनंद व्यक्त केला.
अग्निशमन दलाच्या विनायक लोखंडे, प्रमोद कोलते,हेमंत असकर ,सुशिल कवटे, राठोड आदींच्या टीमने ही कामगिरी केली.