Crime News: कल्याणमध्ये आरपीएफ इन्स्पेक्टरची जवानाने केली हत्या, समोर आलं धक्कादायक कारण
By मुरलीधर भवार | Published: February 9, 2023 02:23 PM2023-02-09T14:23:14+5:302023-02-09T14:23:50+5:30
Crime News: चार वर्षापूर्वी इन्क्रीमेंट राेखल्याच्या रागातून आरपीएफ जवानाने आरपीएफ इन्स्पेक्टर बसवराज गर्ग यांची हत्या केल्याची घटना काल रात्री कल्याण रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या वसाहतीत घडली आहे.
- मुरलीधऱ भवार
कल्याण - चार वर्षापूर्वी इन्क्रीमेंट राेखल्याच्या रागातून आरपीएफ जवानाने आरपीएफ इन्स्पेक्टर बसवराज गर्ग यांची हत्या केल्याची घटना काल रात्री कल्याण रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या वसाहतीत घडली आहे. हत्या करणाऱ्या आरपीएफ जवाना पंकज यादवाला काेळसेवाडी पाेलिसांनी पेण येथून पहाटे तीन वाजता अटक केली आहे. त्याच्या विराेधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बसरावराज गर्ग हे आरपीएफच्या सब इन्स्पेक्टर पदावर कार्यरत हाेते. ते कल्याण रेल्वे स्थानकालगत असलेल्या पूर्व भागात रेल्वे वसाहतीत राहत हाेते. काल रात्री ते राहत असलेल्या बॅरेक्समध्ये माेबाईलवर गाणी एेकत बसले हाेते. त्याचवेळी अचानक आरपीएफ जवान पंकज त्याठिकाणी आला. त्याने हातातील लाकडी दांडक्याने आणि ठाेशा बुक्क्यांनी बसवराज यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत बसवराज यांना गंभीर दुखापत झाली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. बसवराज यांची हत्या करुन आराेपी पंकज घटनास्थळावरुन पसार झाला.
आराेपी पंकज हा चिपळूणच्या दिशेने गेला असल्याची माहिती काेळसेवाडी पाेलिसांना मिळातच सहाय्यक पाेलिस निरिक्षक हरीदास बाेचरे यांच्या पथकाने चिपळूनच्या दिशेने आराेपीचा माग काढला. मात्र आराेपी हा चिपळूणला गेला नसून ताे पेणला गेला असल्याचे कळताच पाेलिसांनी त्याच्या शाेधात पेणच्या दिशेने माेर्चा वळविला. पहाटे तीन वाजता पेण येथून आराेपी पंकजला पाेलिसांनी जेरबंद केले.
२०१९ साली आरपीएफ जवान पंकज यादव आणि त्यांच्या साथीदारात भांडण झाले हाेते. या प्रकरणाची चाैकशी आरपीएफ इन्स्पेक्टर बसवराज गर्ग यांच्याकडे हाेती. चाैकशी अंती पंकज याची चार वर्षाकरीता पगारातील इन्क्रीमेंट आणि बेसिक कपात करण्याची शिक्षा देण्यात आली हाेती. या गाेष्टीचा राग पंकजच्या मनात हाेता. याच कारणावरुन पंकजने बसवराज यांचा जीव घेतला.पंकजची इन्क्रीमेंट राेखण्यात गर्ग यांच्यासह अन्य अधिकारी हे देखील चाैकशी टीममध्ये हाेते. त्यापैकी दाेन अधिकाऱ्यांच्या हत्येचा इरादा पंकजच्या मनी हाेता. त्यासाठी ताे पेणला पळला हाेता. त्या आधीच काेळसेवाडी पाेलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.