‘डोंबिवली ते स्टॅच्यू ऑफ युनिटी’ सायकलवरून प्रवास; चार दिवसांत ४२५ किलोमीटरचे अंतर पार केले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 07:01 AM2024-09-14T07:01:27+5:302024-09-14T07:01:40+5:30
या राईडमध्ये शाळेचे ट्रस्टी, पुण्याचे मित्र यांचा सल्ला घेतला. तलासरी आणि भरूच इथे जैन टेम्पलमध्ये राहण्याची सोय झाली आणि एक दिवस हॉटेलमध्ये राहावे लागले.
अनिकेत घमंडी
डोंबिवली : मुलुंड येथील एका शाळेत शिक्षकीपेशा सांभाळून सायकलिंगचा छंद जोपासणाऱ्या डोंबिवलीकर मीरा वैद्य यांनी ७ ते १० सप्टेंबर या चार दिवसांत डोंबिवली ते स्टॅच्यू ऑफ युनिटी हे ४२५ कि.मीचे अंतर सायकलने एकटीने पूर्ण केले.
त्यांनी त्या प्रवासाची आखणी काही महिने आधी स्वतःच केली होती. त्यासाठी डोंबिवली-तलासरी-नवसारी- भरूच -स्टॅच्यू ऑफ युनिटी असा मार्ग निवडला होता. यापूर्वी पुणे-जम्मू सायकलिंग याच मार्गावरून केल्याने त्यांना रस्त्याची माहिती होती. जेव्हा एकटीने जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा काही जणांनी करू शकतेस असे म्हणत मनोधैर्य उंचावले, तर काही जणांनी नका करू, असेही सांगितले. पण, मनात तीव्र इच्छाशक्ती असल्याने एकटीनेच ही राईड पूर्ण करणार असे ठरविले, असे वैद्य म्हणाल्या.
या राईडमध्ये शाळेचे ट्रस्टी, पुण्याचे मित्र यांचा सल्ला घेतला. तलासरी आणि भरूच इथे जैन टेम्पलमध्ये राहण्याची सोय झाली आणि एक दिवस हॉटेलमध्ये राहावे लागले. त्या भागातही पावसामुळे रस्ते खूप खराब होते. त्यामुळे सायकलची खूप काळजी घ्यावी लागत होती. सतत काही अंतरावर पाऊस पडत असल्याने पूर्ण चार दिवस भिजत राईड पूर्ण करावी लागली, असे त्या म्हणाल्या.
आपण आपली काळजी घ्यावी
जेव्हा पाच कि.मी.वरून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे दर्शन झाले, तेव्हा तर आनंद गगनात मावेनासा झाला. कोणी विचारले नाही तरी सांगावेसे वाटते की हो मी माझे स्वप्न पूर्ण केले. आता पूर्ण केलेल्या स्वप्नामुळे आत्मविश्वास अधिकच वाढला आहे. एकटीने प्रवास करताना कोणताही वाईट अनुभव न आल्याने सर्व महिलांना सांगावेसे वाटते, सगळे जग वाईट नसते, फक्त आपण आपली काळजी घेत प्रवास सुरू ठेवायचा. राईड करताना बरेच स्थानिक हात उंचावून शुभेच्छा देत होते, तर कोणी एकटीने हे धाडस केले याचे कौतुक करीत होते, असे मीरा वैद्य यांनी सांगितले.