सामाजिक उपक्रम आणि गोविंदांच्या सुरक्षेची हमी देणारी हंडी : मंत्री रवींद्र चव्हाण
By अनिकेत घमंडी | Published: August 19, 2022 03:21 PM2022-08-19T15:21:58+5:302022-08-19T15:22:21+5:30
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने भाजपा डोंबिवली शहरतर्फे ही दहीहंडी आयोजित करण्यात येते.
डोंबिवली: या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी मानण्यात येते. मराठी संस्कृती, साहित्य, शैक्षणिक उपक्रमासोबत डोंबिवलीला विशेषतः हिंदू सणांची नगरी संबोधलं जाते. दहीहंडीचा थरार आज दोन वर्षांनी अनुभवायला डोंबिवली सज्ज झाली आहे. गुढी पाडवा स्वागत यात्रा पहिल्यांदा सुरु झाली ती डोंबिवली शहरातूनच. दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधांनंतर पुन्हा एकदा शहराचा मानबिंदू ठरलेली भारतीय जनता पार्टीची दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. डोंबिवलीच्या मध्यवर्ती बाजी प्रभू चौकात हंडी फोडण्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच कल्याण उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर येथील गोविंदा पथके दरवर्षी येतात.
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने भाजपा डोंबिवली शहरतर्फे ही दहीहंडी आयोजित करण्यात येते. सर्वात सुरक्षित दहीहंडी असे याचे वर्णन करता येईल. गोविंदा पथके हंडी फोडताना किंवा सलामी देताना थरातील सर्वात वरील दोन थरातील गोविंदांना पाठीला हार्नेस लावूनच मनोरा उभा करणे अनिवार्य केले जाते. अशा रीतीने थरातील दोन गोविंदा यांना हार्नेसचे सुरक्षा कवच दिल्याने त्यांच्या जीवाची पूर्णतः काळजी घेतली जात असल्याचे चव्हाण म्हणाले.
संपूर्ण मुंबई व ठाणे शहरांतील हार्नेस लावली जाणारी एकमेव दहीहंडी म्हणून भाजपा डोंबिवलीची दहीहंडी गोविंदा पथकांमध्ये प्रसिद्ध आहे.
याच बरोबर दरवर्षी दहीहंडीच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक धार्मिक असे संदेश दिले जातात. यापूर्वी चिनी मालावर बहिष्कार, स्त्री भ्रूणहत्या विरोध असे विविध राष्ट्रीय विचारसरणी पुरस्कार करणारे विषय दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडले होते. यंदाचा विषय हिंदुत्व आणि विकास असा असून देशाचा व राज्याचा सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवण्यात आलेलं असल्याचे ते म्हणाले.