दिवसा करायचा कॅटरर्सची कामे; रात्री अभ्यास, सागरने दहावीत मिळवले सर्व विषयात ३५ गुण
By सचिन सागरे | Published: May 28, 2024 04:09 PM2024-05-28T16:09:40+5:302024-05-28T16:11:03+5:30
कला शाखेत प्रवेश घेऊन वकील होण्याचे सागरचे स्वप्न आहे.
कल्याण : पूर्वेकडील सिद्धार्थ नगर परिसरात राहणाऱ्या सागर गोविंद कांबळे या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत सर्व विषयात ३५ गुण मिळवले आहेत. कला शाखेत प्रवेश घेऊन वकील होण्याचे सागरचे स्वप्न आहे.
पूर्वेकडील गायत्री प्राथमिक विद्यालय येथे सागर शिक्षण घेत होता. सागरची आई कॅटरर्सचे काम करते तर वडील घरीच असतात. हातावर पोट असणाऱ्या या कुटुंबात त्याने हे यश मिळवून दाखवले आहे. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने घराला आर्थिक हातभार मिळावा म्हणून सागर कॅटरर्सचे काम देखील करतो. दिवसभर कॅटरर्सचे काम करणारा सागर रात्री ८ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत अभ्यास करायचा.
पुढे कला शाखेत प्रवेश घेणार असून वकिलीचा अभ्यास करणार आहे. पुढील शिक्षण काम करत करत पूर्ण करणार असल्याचे सागरने यावेळी सांगितले. आईवडील अशिक्षित असले तरी दहावीत सर्व विषयात ३५ गुण मिळाल्याचा त्यांना मोठा आनंद झाल्याचे सागरचे म्हणणे आहे.