भंडार्ली डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची डेडलाइन उलटली; ...तर गाडया जाळू, आमदार राजू पाटील यांचा इशारा
By प्रशांत माने | Published: October 1, 2023 05:20 PM2023-10-01T17:20:36+5:302023-10-01T17:22:18+5:30
दरम्यान २० ऑक्टोबरपर्यंत डम्पिंग बंद करू या आश्वासनानंतर आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले.
डोंबिवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रविवारी सर्वत्र स्वच्छता अभियान राबविले गेले परंतू भंडार्ली डम्पिंग आश्वासन देऊन देखील बंद न केल्याच्या निषेधार्थ १४ गाव सर्वपक्षीय संघर्ष समिती आणि मनसेचे आमदार राजू पाटील यांच्यावतीने डम्पिंगच्या प्रवेशद्वारावर आंदोलन छेडण्यात आले. कचरा टाकण्यासाठी आलेले डम्पर रोखले गेले तर डम्पिंग बंद करण्याचे लेखी आश्वासन दिले नाहीतर गाडया जाळून टाकू असा इशारा आमदार पाटील यांनी ठाणे महापालिका प्रशासनाला दिला. दरम्यान २० ऑक्टोबरपर्यंत डम्पिंग बंद करू या आश्वासनानंतर आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले.
भंडार्ली येथील डम्पिंग स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याने ते बंद करा अशी मागणी सातत्याने होत आहे. डम्पिंग बंद करण्याचे आश्वासन मनपाकडून दिले गेले होते. परंतू त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने १४ गाव सर्वपक्षीय संघर्ष समिती आणि मनसेचे आमदार पाटील यांच्याकडून याआधीही आंदोलने छेडली गेली आहेत. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेऊन पाटील यांनी चर्चा केली होती. त्यावेळी ३० सप्टेंबरपर्यंत डम्पिंग बंद करू असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. परंतू डेडलाइन उलटूनही डम्पिंग सुरूच राहीले. यावर १४ गाव सर्वपक्षीय संघर्ष समिती आणि आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांनी आक्रमक होत कचरा टाकण्यासाठी आलेल्या सर्व गाडया डम्पिंगच्या प्रवेशद्वारावर रोखून धरल्या होत्या.
कोणाला काहीच पडलेली नाही
डम्पिंग बंद करण्याची डेेडलाइन फेब्रुवारी महिन्याची दिली होती. परंतू त्यानंतर प्रशासनाने केलेल्या विनंतीनुसार डेडलाइन ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली होती. त्यानंतरही इथले डम्पिंग बंद झालेले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे देखील हा प्रश्न मार्गी लावण्यात अपयशी ठरले आहेत. तिकडे अंबरनाथचा कचरा करवले गावात आणून टाकला जात आहे तर ठाण्यातील कचरा इथे टाकला जात आहे. कोणाला काहीच पडलेले नाही. स्थानिक मात्र दुर्गंधीचा त्रास सहन करत आहेत त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन सुरूच राहिल. कच-याच्या गाडया येऊच देणार नाही. गाडया आल्या तर त्या जाळू असा आक्रमक पवित्रा आमदार पाटील यांनी घेतला होता.
२० ऑक्टोबरपर्यंत बंद करू डम्पिंग
दरम्यान आंदोलनाची माहीती मिळताच ठाणे महापालिकेचे उपायुक्त तुषार पवार हे घटनास्थळी पोहोचले. डम्पिंग ग्राउंड बंद करण्याबाबत काही तांत्रिक अडचणी आहेत. त्या लवकरात लवकर सोडविण्यात येतील. २० ऑक्टोबरपर्यंत हे डंम्पिंग ग्राउंड बंद केले जाईल असे आश्वासन त्यांच्याकडून आंदोलनकर्त्यांना देण्यात आले. यावेळी पवार यांच्यासोबत ठाणे महापालिकेचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी हे देखील उपस्थित होते.