शिर्डीला पालखी नेणाऱ्या टिटवाळ्यातील तिघांचा मृत्यू; वाहनाची धडक; मृतांत दाेन चुलत भावांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 06:46 AM2024-07-18T06:46:33+5:302024-07-18T06:46:52+5:30
टिटवाळा येथील मांडा परिसरात राहणाऱ्या तरुणांचे साई आश्रय सेवा मंडळ २२ वर्षांपासून दरवर्षी साई पालखी घेऊन शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला जातात.
कल्याण : टिटवाळ्यातून साई पालखी घेऊन दीडशे तरुणांचा ताफा पायी चालत शिर्डीकडे निघाला असताना घोटी, सिन्नर दरम्यान मंगळवारी सकाळी वाहनाच्या धडकेत पालखीत सहभागी असलेल्या ३ साईभक्तांचा मृत्यू झाला. यापैकी दोघे सख्खे चुलत भाऊ आहेत. तिघांपैकी एक रवींद्र पाटील याच्या घरी आई, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. आरोपीला अटक करून त्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मृतांच्या कुुटुंबीयांनी केली.
टिटवाळा येथील मांडा परिसरात राहणाऱ्या तरुणांचे साई आश्रय सेवा मंडळ २२ वर्षांपासून दरवर्षी साई पालखी घेऊन शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला जातात. शनिवारी पालखी घेऊन मंडळाचे तरुण सदस्य शिर्डीच्या दिशेने पायी रवाना झाले. एका गाडीने पायी जात असलेल्या साईभक्तांना धडक दिली. या धडकेत रवींद्र ऊर्फ कवी सुरेश पाटील, भावेश राम पाटील, साईराज भोईर, सलमान पठाण हे जखमी झाले. त्यापैकी रवींद्र पाटील, भावेश पाटील, साईराज भोईर यांचा मृत्यू झाला. सलमान पठाण हे जखमी आहेत. पालखी दरवर्षी शिर्डीला जाते. यापूर्वी पालखी घेऊन जात असताना झालेल्या अपघातात लालू भोईर आणि जगदीश पाटील हे वेगवेगळ्या घटनेत जखमी झाले.
१६ तास उलटूनही आरोपी मोकाट
नातेवाईक अशोक पाटील यांनी सांगितले की, मद्यपान करून गाडी चालवून अपघात करणाऱ्या गाडीचालकास कठोर शिक्षा झाली पाहिजे. घटनेला १६ तास उलटून गेले तरी आरोपी अद्याप मोकाट आहे. पोलिसांनी त्याला अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी.