कल्याणमध्ये दोन ढोकरी पक्षांचा मृत्यू; बर्ड फ्लूमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतिचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 02:25 PM2021-01-12T14:25:19+5:302021-01-12T14:25:37+5:30
गौरीपाडा परिसर हा उल्हास नदीला लागून आहे. या परिसरात झाडे आहेत. तसेच विविध जातीच्या पक्षांचा वावर आहे.
कल्याण: राज्यात बर्ड फ्लूमुळे पक्षांचा मृत्यू होत असताना आज कल्याण पश्चिमेतील गौरी पाडा परिसरात दोन ढोकरी पक्षी मृत अवस्थेत पडल्याचे एका झाडाखाली मिळून आले. या पक्षाचा मृत्यूही बर्ड फ्लूने झाला असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. बर्ड फ्लूचे लोण आत्ता कल्याणमध्ये येऊन ठेपले असल्याचे बोलले जात आहे.
गौरीपाडा परिसर हा उल्हास नदीला लागून आहे. या परिसरात झाडे आहेत. तसेच विविध जातीच्या पक्षांचा वावर आहे. गौरीपाडा परिसरातील गुरु आत्ममन या इमारत परिसरातील सर्कलजवळ असलेल्या एका झाडाखाली दोन ढोकरी पक्षी मृत अवस्थेत पडल्याची माहिती स्थानिक नागरीकांनी भाजप माजी नगरसेवक दया गायकवाड यांना दिली.
गायकवाड यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाला ही बाब सूचित केली आहे. या पक्षांचे मृतदेह पुढील चाचणी करण्यासाठी पाठवून देण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे. काही दिवसापूर्वी अशा प्रकारे या परिसरात सहा पक्षांचा मृत्यू झाला होता. मात्र त्यावेळी बर्ड फ्लूचा बोलबाला नव्हता. आत्ता ढोकरी पक्षाचा मृत्यू झाल्याने बर्ड फ्लूची चर्चा कल्याणमध्ये सुरु झाली आहे.