मुंबई पाठोपाठ कल्याण डोंबिवलीत डीप क्लिनिंग मोहिम
By मुरलीधर भवार | Published: January 4, 2024 09:01 PM2024-01-04T21:01:23+5:302024-01-04T21:10:29+5:30
या मोहिमेचा शुभारंभाच्या आधीच महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने डीप क्लिनिंग सुरु केले आहे.
कल्याण-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत डीप क्लिनिंग मोहिम सुरु आहे. ही मोहिम राज्यभरात राबविली जाणार आहे. मुंबई पाठोपाठ आत्ता कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील आय प्रभाग क्षेत्रात या मोहिमाचे उद्या ५ जानेवारी रोजी शुंभारंभ केला जाणार आहे.
या मोहिमेचा शुभारंभाच्या आधीच महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने डीप क्लिनिंग सुरु केले आहे. कल्याण पूर्वेतील चक्कीनाका ते नेवाळी या मलंग रोडवर रस्ते झाडून घेण्यात आले. रस्त्याचे दुभाजक स्वच्छ करण्यात आहे. ठिकठिकाणी साठलेला कचरा उचलण्यात आला. त्याचबराेबर या रस्त्यावरील बड्या नाल्यातून जेसीबीच्या सहाय्याने गाळ आणि कचरा काढण्यात आला. या प्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर, आरोग्य अधिकारी ए. घुटे आदींनी स्वत: उपस्थित राहून ही कामे सुरु केली. त्याचबरेाबर रस्त्यालगतचे अतिक्रमण ह टविण्याचे काम आज दिवसभर सुरु होते. याशिवाय रस्त्याच्या कडेला उभी असलेली बेवारस वाहने जप्त करण्यात आली. जेबीसीच्या सहाय्याने ही वाहने उचलून रस्ता वाहतूकीसाठी मोकळा करण्यात आला आहे.
कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ उद्या केला जाणार आहे. सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत मलंग रोडवरील बुद्ध विहारा पासून या मोहिमेची सुरुवात केली जाणार आहे. त्यानंतर आठवड्यातील दर शनिवारी महापालिकेच्या सर्व प्रभागात ही मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी प्रभाग निहाय जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. सामाजिक संस्थासह विद्यार्थ्यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. शहर स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी केले आहे.