उल्हासनगरात सखोल स्वच्छता मोहीम; उपायुक्त सुभाष जाधव यांच्याकडू पाहणी
By सदानंद नाईक | Published: January 15, 2024 07:40 PM2024-01-15T19:40:17+5:302024-01-15T19:40:39+5:30
उल्हासनगरात डीप स्वच्छता मोहीम राबविली जात असून मोहिमेत नागरिक सहभागी होत आहेत.
उल्हासनगर : महापालिकेच्या वतीने सखोल स्वच्छता मोहीम शहरात राबविली जात असून आरोग्य विभागाचे उपायुक्त सुभाष जाधव यांनी शहरातील विविध भागात पाहणी केली. डम्पिंग व कचरा वर्गीकरण झाल्यास शासनाच्या स्वच्छता सर्वेक्षण मध्ये पहिल्या ५ मध्ये येणार असल्याची शक्यता आयुक्त तथा प्रशासक अजीज शेख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
उल्हासनगरात डीप स्वच्छता मोहीम राबविली जात असून मोहिमेत नागरिक सहभागी होत आहेत. शहर पश्चिमेतील निळकंठ मंदिर, भाजी मार्केट, भारत चौक, झुलेलाल मंदिर, शिवरोड मंदिर परिसर, , मोहटा देवी मंदिर परिसर, बालकांजी बारी परिसर, आस्था हॉस्पीटल ते पंजाबी कालनी परिसर, हरी किर्तण दरबार परिसर, महादेव मंदिर भारत टॉकीज परिसर, हनुमान मंदिर खन्ना कंपाऊंड परिसर, हनुमान मंदिर जय जनता कॉलनी, साईबाबा मंदिर, सिध्दार्थ बालवाडी आशिर्वाद सोसायटी आदी परिसरात सखोल स्वच्छता मोहीम राबविली जात आहे.
शहर पूर्वेतील अमर जवान चौक, बंगलो एरिया, गांधी रोड, न्यु इंग्लिश स्कुल रस्ता, संभाजी चौक आदी ठिकाणी सखोल स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. उपायुक्त सुभाष जाधव, मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार यांच्यासह महापालिका अधिकारी, कर्मचारी व नागरिक असे एकुण ७०० पेक्षा अधिक नागरीकांनी श्रमदान करुन सफाई व स्वच्छता केली. तसेच शहरातील नागरीकांना सदर मोहिमेत सहभागी होवुन शहर स्वच्छतेकडे लक्ष केंद्रीत करण्याचे आहवान केले. मोहिमे अंतर्गत सर्व मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, फुटपाथ, नाले आदी ठिकाणी सफाई मोहीम राबविली. नागरीकांना तसेच स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.
१२ नागरिकांकडून ४ हजाराचा दंड वसूल
महापालिकेने सखोल स्वच्छता मोहीम वेळी सार्वजनिक रस्त्यावर अस्वच्छता करणाऱ्या एकूण १२ नागरिका विरुद्ध कारवाई करीत त्यांच्याकडून ४ हजाराचा दंड वसूल केल्याची माहिती उपायुक्त सुभाष जाधव यांनी दिली आहे.