प्रसुतीगृह सुरू करण्यास दिरंगाई; मनसेने छेडले ‘चॉकलेट’ आंदोलन

By प्रशांत माने | Published: June 19, 2023 07:11 PM2023-06-19T19:11:11+5:302023-06-19T19:12:04+5:30

मनपा मुख्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना चॉकलेट देण्यात आले.

delay in opening maternity hospital MNS teased the chocolate movement | प्रसुतीगृह सुरू करण्यास दिरंगाई; मनसेने छेडले ‘चॉकलेट’ आंदोलन

प्रसुतीगृह सुरू करण्यास दिरंगाई; मनसेने छेडले ‘चॉकलेट’ आंदोलन

googlenewsNext

कल्याण : पुर्वेकडील भागात प्रसुतीगृह सुरू करण्याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही त्याकडे केडीएमसी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ आज मनसेच्या वतीने चॉकलेट आंदोलन छेडण्यात आले. मनपा मुख्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना चॉकलेट देण्यात आले. नुसते तोंडी आश्वासन देऊन आम्हाला चॉकलेट देऊ नका ठोस कृती करा अन्यथा पुढील आंदोलन गोड नाहीतर कडवट असेल असा इशारा यावेळी मनसे पदाधिका-यांनी दिला.

प्रसुतीगृह सुरू करण्याबाबत गेली १५ वर्षे पाठपुरावा सुरू आहे. मोर्चे, आंदोलन आणि दोन वेळा उपोषण करण आले. प्रत्येक वेळी आश्वासनाचे चॉकलेट प्रशासनाकडून देण्यात आल्याकडे मनसे पक्षाचे उपजिल्हा अध्यक्ष तथा जनहित विधी कक्ष विभागाचे कल्याण शहर अध्यक्ष उदय वाघमारे यांनी लक्ष वेधले. मे महिन्याच्या अखेरीस प्रसुतीगृह सुरू करू असे देखील प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. याउपरही ठोस कृती न झाल्याने वाघमारे यांनी चॉकलेट आंदोलनाचा इशारा दिला होता. आजच्या आंदोलनात वाघमारे यांच्यासह मनसेचे जिल्हा पदाधिकारी उल्हास भोईर, कौस्तुभ देसाई, उर्मिला तांबे, स्वाती कदम, जयेश खंदारे, डॉ श्रध्दा केदार, अॅड मोहीनी सातवे आदिंसह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 मनपा मुख्यालयात छेडण्यात आलेल्या आंदोलनात सुरूवातीला अधिकारी भेटायला येत नाहीत म्हणून मुख्य प्रवेशद्वाराबाहेर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. कार्यालयात घुसण्याचा इशारा देताच पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची बांधकाम विभागाचे अधिकारी जगदिश कोरे यांच्याशी भेट घडवून देण्यात आली. यावेळी पदाधिका-यांनी प्रसुतीगृह सुरू करण्यास होत असलेल्या दिरंगाई बाबत जाब विचारत कोरे यांना चॉकलेट दिली. यावर प्रस्तुतीगृह बांधण्यासंदर्भात बांधकाम निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या सात दिवसात बांधकामाला सुरूवात होईल असे कोरे यांनी शिष्टमंडळाला सांगितले. जर कामाला सुरूवात नाही झाली तर पुढील आंदोलन कडवट असेल असा इशारा मनसे पदाधिका-यांनी यावेळी दिला.

Web Title: delay in opening maternity hospital MNS teased the chocolate movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.