मुरबाड शहापूर MMRDA मध्ये समाविष्ट करण्याची मागणी
By पंकज पाटील | Updated: January 9, 2024 19:25 IST2024-01-09T19:21:33+5:302024-01-09T19:25:24+5:30
संपूर्ण मुंबई आणि ठाण्याची तहान भागवणारा तालुका म्हणजे मुरबाड शहापूर

मुरबाड शहापूर MMRDA मध्ये समाविष्ट करण्याची मागणी
बदलापूर : मुरबाड आणि शहापूर हे दोन्ही तालुके मुंबई - ठाण्याला लागून असल्याने या दोन्ही तालुक्यांचा विकास व्हावा यासाठी त्याचा समावेश एम एम आर डी ए क्षेत्रमध्ये करावा अशी मागणी आमदार किसन कथोरे यांनी केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये ही मागणी करण्यात आली आहे.
संपूर्ण मुंबई आणि ठाण्याची तहान भागवणारा तालुका म्हणजे मुरबाड शहापूर. ह्या दोन्ही तालुक्यांमुळेच खऱ्या अर्थाने मुंबई आणि ठाणे यांचा विकास झाला आहे. मात्र हे दोन्ही तालुके खऱ्या अर्थाने विकसित व्हावे यासाठी त्याचा समावेश एमएमआरडीए क्षेत्रामध्ये करावा अशी मागणी केल्या अनेक वर्षांपासून आमदार किसन कथोरे करीत होते. त्याच अनुषंगाने सोमवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये या दोन्ही तालुक्यांचा समावेश एमएमआरडीए रिजनमध्ये करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
शहापूर तालुक्यात असलेल्या तानसा, वैतरणा आणि भातसा या तीन प्रमुख धरणांमुळेच संपूर्ण मुंबई शहराची ताण भागवली जात आहे. त्यातच आता ठाणे शहराला देखील याच धरणातून पाणीपुरवठा होत आहे.
मुरबाड तालुक्यातील बारवी धरणातून देखील ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याच्या दृष्टिकोनातून मुरबाड तालुका हा ठाणे जिल्ह्यासाठी प्रभावी आहे.
शहापूर आणि मुरबाड हे दोन्ही तालुके मुंबई आणि ठाणे शहराची तहान भागवणारे तालुके आहेत. मात्र हे दोन्ही तालुके विकासापासून काहीसे लांब असल्यामुळे आता या दोन्ही तालुक्यांचा विकास व्हावा यासाठी एमएमआरडीएमध्ये त्याचा समावेश करावा ही मागणी रास्त मानली जात आहे.
एम एम आर डी ए क्षेत्रांमध्ये संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील शहरी भागाचा समावेश करण्यात आला आहे. आता शहापूर आणि मुरबाड हे दोन्ही तालुके देखील शहरीकरणाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत.
एम एम आर डी ए क्षेत्रामध्ये या दोन्ही तालुक्यांचा समावेश झाल्यास हे दोन्ही तालुके मुंबई आणि ठाण्याशी सहज जोडले जाऊ शकतात. तसेच विकास कामांसाठी निधी देखील मोठ्या प्रमाणात मिळू शकतो.
''मुरबाड आणि शहापूरच्या पाण्यावर मुंबई आणि ठाणे शहराचा विकास होत असेल तर या दोन्ही तालुक्यांच्या विकासासाठी देखील मुंबईने हातभार लावणे गरजेचे आहे.
- किसन कथोरे, आमदार- मुरबाड विधानसभा