स्मार्टफोन नसलेल्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी; अजय सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 12:29 PM2021-05-15T12:29:36+5:302021-05-15T12:29:44+5:30
कल्याण- डोंबिवलीत असणाऱ्या खासगी रुग्णवाहिका चालक सर्वसामान्यांना अव्वाच्या सव्वा दराने भाडे आकारात अक्षरशः लुबाडणूक करत आहेत.
कल्याण: कल्याण- डोंबिवलीमध्ये लसीकरण मोहीम सुरू असली तरी या मोहिमेसाठी ऑनलाईन पूर्वनोंदणीची अट ठेवण्यात आली आहे. मात्र यामुळे समाजातील वंचित नागरीकांना अनेक अडचणी येत आहेत. स्मार्टफोन नसणाऱ्या समाजातील लोकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी युवा सामाजिक कार्यकर्ते अजय सावंत यांनी केली आहे. तसेच कल्याण डोंबिवलीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवणाऱ्या समस्यांसंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला इमेल देखील केला आहे.
कल्याण- डोंबिवलीत असणाऱ्या खासगी रुग्णवाहिका चालक सर्वसामान्यांना अव्वाच्या सव्वा दराने भाडे आकारात अक्षरशः लुबाडणूक करत आहेत. रुग्णवाहिका राज्य सरकारने आपल्या ताब्यात घेऊन त्या मोफत उपलब्ध करून देण्याची मागणीही सावंत यांनी केली आहे.त्याचबरोबर केडीएमसीच्या आर्ट गॅलरी कोवीड सेंटरमध्ये कोवीडचा कमी प्रमाणात संसर्ग झाला असतानाही रुग्णांचा मृत्यू होत असल्याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात प्रश्न उपस्थित केले आहेत.
राज्य शासनाने या सर्व प्रश्नांवर तातडीने उपाय योजना करावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. कल्याण डोंबिवलीतील नागरिकांसाठी जे पत्र लिहलं होत त्यात नमूद केलेल्या मागण्यांची त्वरित दखल घेण्यात आली असून, या मागण्यांचे निवेदन नगरविकास तसेच सार्वजनिक आरोग्य विभागास पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे असे सावंत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.