मुंबईतील शिक्षकांच्या मागण्या एसएससी बोर्डाकडून मान्य
By अनिकेत घमंडी | Published: March 1, 2023 05:05 PM2023-03-01T17:05:19+5:302023-03-01T17:05:30+5:30
मुंबईतील अपंग, ५५ वर्षावरील गंभीर आजाराने त्रस्त तसेच समुपदेशक शिक्षकांना १० वीच्या कामातून वगळण्यासोबतच शिक्षकांच्या इतर मागण्या मान्य
डोंबिवली:
मुंबईतील अपंग, ५५ वर्षावरील गंभीर आजाराने त्रस्त तसेच समुपदेशक शिक्षकांना १० वीच्या कामातून वगळण्यासोबतच शिक्षकांच्या इतर मागण्या मान्य झाले असल्याचे भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष व मुंबई मराठी अध्यापक संघाचे कार्यवाह अनिल बोरनारे यांनी सांगितले.
मुंबईतील शिक्षक, संस्थाचालक, केंद्र संचालक यांच्या विविध मागण्यांबाबत बोरनारे यांनी आज वाशी येथील एसएससी बोर्डाचे सचिव डॉ सुभाष बोरसे यांची बुधवारी भेट घेतली. या मागण्यांसोबतच रनर (शिक्षकांना) स्टिकरचे काम दिले जाणार नाहीत, ८० गुणांचे पेपर २०० व ४० गुणांचे पेपर २५० च्या वर देणार नाहीत, आय टी विषय अनुदानित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाईल, मुंबईतील रात्र शाळा मुख्याध्यापकांना या कामातून वगळण्यात येईल, विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट तारखेप्रमाणे दिले जाईल. यासोबतच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्या तातडीने मंजूर करणे, १० २० ३० वर्षाची आश्वासीत प्रगती योजना तातडीने लागू करणे, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी व १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, जुलै च्या परीक्षेचा केंद्र प्रवास खर्च तातडीने देण्यात यावा, खेळाडू वाढीव गुण शुल्क बंद करावे, मुंबईत काही शिक्षकांना केंद्रप्रमुख व नियामक अशा दोन्ही जबाबदाऱ्या दिल्या असून एकच काम द्यावे, भूगोल विषयाच्या नियामकांचे प्रलंबित वाहतुकीचे मानधन त्वरित अदा करावे, मुंबईतील शाळांची भौतिक सुविधा पाहूनच प्रमाणापेक्षा विद्यार्थी देऊ नये, १० वी व १२ वी यापैकी एकच केंद्र देण्यात येऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान टाळावे, नियामकांना बोर्डात बोलावण्यासाठीचा प्रवास भत्ता रोख स्वरूपात देण्यात यावा, शैक्षणिक गुणवत्तावाढी साठी विषय संघटनांच्या बैठकींचे आयोजन करण्यात यावे, विषय संघटनांना विषय प्रशिक्षण देण्यासाठी परवानगी देण्यात यावी, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी शिफारस केलेल्या समुपदेशकांना बोर्डाच्या कामकाजातून वगळणेबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले. त्यावेळी भाजपा शिक्षक आघाडीचे उत्तर विभाग अध्यक्ष दशरथ काशीद, पश्चिम विभागाचे अध्यक्ष सचिन पांडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बयाजी घेरडे, सुभाष अंभोरे, योगेश ठाकरे व दिनेश वाघ आदी उपस्थित होते.