आधी घेतली शपथ नंतर केले उल्लंघन! पुष्पगुच्छाला प्लास्टीक लावल्याने उपायुक्तांना ५ हजार रुपयांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 05:50 PM2022-01-03T17:50:02+5:302022-01-03T17:50:48+5:30
अनेकदा कल्याण डोंबिवली महापलिका विविध जनजागृती करण्यासाठी नागरीकांना आवाहन करीत असते. काही प्रसंगी महापालिकेकडून त्याचे पालन केले जात नाही.
अनेकदा कल्याण डोंबिवली महापलिका विविध जनजागृती करण्यासाठी नागरीकांना आवाहन करीत असते. काही प्रसंगी महापालिकेकडून त्याचे पालन केले जात नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण असे असते. मात्र आज महापालिकच्या कार्यक्रमात प्लास्टीक न वापरण्याची शपथ घेतली गेली. त्याच कार्यक्रमात पुष्पगुच्छाला प्लास्टीकचे आवरण वापरल्याने घनकचरा विभागाच्या उपायुक्तांनी चक्क महिला उपायुक्तास पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. चांगल्या कामाची सुरुवात घरापासून केल्याचे मत घनकचरा उपायुक्तांनी व्यक्त केले आहे.
महापालिका मुख्यालयात सुरक्षा रक्षकांनी रक्तदान शिबीराचे आयोजन आज करण्यात आले होते. या कार्यक्रमास खुद्द आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी उपस्थीत होते. यावेळी रक्तदान शिबीराचा शुभारंभ झाला. मात्र महापालिका 2 ते 9 जानेवारी दरम्यान महापालिकेकडून प्लास्टीक विरोधी मोहिम राबविली जात आहे. त्यापूर्वी महापलिकेने कल्याण डोंबिवलीतील दुकानदारांकडून प्लास्टीक पिशव्या जप्त करण्याची कारवाई केली होती. आज रक्तदान शिबीराच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्लास्टीक न वापरण्याची शपथ उपस्थितांनी घेतली. याच कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी पुष्पगुच्छ देण्यात आले. या कार्यक्रमास उपायुक्त पल्लवी भागवत या उपस्थित होते. त्याचबरोबर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे हे देखील उपस्थित होते. त्यांच्या नजरेत ही बाब आली की, पुष्पगुच्छ दिला जात आहे. त्याला प्लास्टीकचे आवरण आहे. त्यांनी या प्रकरणी उपायुक्त भागवत यांनी प्लास्टीक वापर केल्याने पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
प्लास्टीकचा वापर न करण्याची सवय महापालिकेच्या सर्व कामगार अधिकारी वर्गास लागली पाहिजे. चांगल्या कामाची सुरुवात स्वत:पासून स्वत:च्या घरापासून केली पाहिजे असे कोकरे यांनी कारवाई पश्चात सांगितले. या संदर्भात उपायुक्त भागवत यांच्याकडून काही एक प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही. तर सुरक्षा रक्षकांनी कार्यक्रम जरी त्यांचा असला तरी उपायुक्तांच्या विरोधात कारवाई झाल्याचे स्पष्ट केले आहे. तर काहींच्या मते ही कारवाई सुरक्षा रक्षकांच्या विरोधात केली असल्याचे सांगण्यात आले. मात्र उपायुक्त कोकरे यांनी उपायुक्तांच्या विरोधात कारवाई केल्याचे मान्य करीत अन्य चर्चाना पूर्णविराम दिला आहे.