माथेरानमधील रस्त्याला दिले केडीएमसीच्या उपायुक्तांचे नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 12:17 AM2021-04-10T00:17:31+5:302021-04-10T00:18:24+5:30

कचरामुक्त डम्पिंग ग्राउंडची राबविली होती संकल्पना

Deputy Commissioner of KDMCs Name given to the road in Matheran | माथेरानमधील रस्त्याला दिले केडीएमसीच्या उपायुक्तांचे नाव

माथेरानमधील रस्त्याला दिले केडीएमसीच्या उपायुक्तांचे नाव

Next

कल्याण : माथेरान नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी म्हणून काम करीत असताना कचरामुक्त डम्पिंग ग्राउंडची संकल्पना राबवून ती यशस्वी करणारे आणि सद्य:स्थितीला केडीएमसीत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले रामदास कोकरे यांचे नाव रस्त्याला देऊन माथेरान गिरीस्थान नगरपालिकेने त्यांचा विशेष सन्मान केला आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत रुजू होण्यापूर्वी माथेरान गिरीस्थान नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार रायगड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कोकरे यांच्याकडे सोपविला होता. 

त्यांनी, तत्पूर्वी वेंगुर्ला व कर्जत येथे त्यांच्यामार्फत राबविलेली ‘कचरामुक्त डम्पिंग ग्राउंड’ ही संकल्पना महाराष्ट्राचे मिनी हिल स्टेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माथेरानमध्येही राबविली आणि ती यशस्वी करून दाखवली. कोकरे यांनी माथेरानमधील ‘डम्पिंग ग्राउंड’चे रूपांतर ‘खेळाच्या मैदाना’त केले तसेच माथेरानच्या पर्यावरणपूरक सर्वांगीण विकासात भरीव योगदान दिल्याबाबत माथेरान गिरीस्थान नगरपालिका हद्दीतील ‘सेटविला नाका ते कचरा डेपो’ या रस्त्याचे नामकरण ‘श्री. रामदास तुकाराम कोकरे मार्ग’ असे करून कोकरे यांच्या कार्याचा गौरव केला.

नामकरणाच्या उद्घाटन सोहळ्यास तत्कालीन रायगड जिल्हाधिकारी व विद्यमान केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, उपायुक्त उमाकांत गायकवाड, माथेरान नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव व इतर मान्यवर हे व्हीसीद्वारे उपस्थित होते. 

दरम्यान, केडीएमसीत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त म्हणून रुजू झाल्यापासून कोकरे यांनी ‘शून्य कचरा मोहीम’ राबविण्यासाठी अनेक अभिनव संकल्पना राबविल्या आहेत. सरकारी अधिकारी म्हटले की आपल्यासमोर लागलीच नकारात्मक किंवा एक विशिष्ट साचेबद्ध प्रतिमा उभी राहते. याला काही अधिकारी मात्र अपवादही असतात. 

कचऱ्यासारखा संवेदनशील विषय योग्य प्रकारे हाताळणाऱ्या आणि यशस्वी करून दाखविणाऱ्या कोकरेंचे काम इतरांसाठी प्रेरणादायी ठरले 
आहे. इतरांनी त्यांचा आदर्श ठेवावा असे त्यांचे काम आहे.

शून्य कचरा मोहिमेमुळे आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर जाणारा कचरा कमी झाला आहे. 
हा कचरा कमी करत भविष्यात आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी ते प्रयत्नशील असून तसे झाल्यास नागरिकांचा त्रास वाचणार आहे.

Web Title: Deputy Commissioner of KDMCs Name given to the road in Matheran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.