गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त! १ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त
By प्रशांत माने | Published: March 18, 2024 07:24 PM2024-03-18T19:24:03+5:302024-03-18T19:24:24+5:30
आरोपी निलेश पाटील याला अटक केली.
डोंबिवली: मानपाडा पोलिसांनी कोळेगाव परिसरात सुरू असलेली गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून गावठी दारूसह इतर साहित्य असा १ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी निलेश पाटील ( वय २६) याला अटक केली असून त्याच्याविरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत हातभट्टी दारू, मादक पदार्थ विक्री, अवैध हत्यारांची विक्री होणार नाही याबाबत सर्च ऑपरेशन सुरू आहे. पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रशांत आंधळे यांच्या पथकाला कोळेगाव परिसरात समाधान हॉटेलच्या मागे नाल्यातील झाडीमध्ये हातभट्टीची दारू गाळत असल्याची माहीती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली.
त्यांच्या पथकाने वरीष्ठ पोलिस निरक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी संध्याकाळी पाच वाजता छापा टाकला असता त्याठिकाणी गावठी हातभट्टीची दारू बनविण्याची साधनं, गाळलेली दारू, ड्रम, लोखंडी टाकी, दोन इंजिन असा १ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल आढळुन आला.