सीलबंद प्रवेशद्वारांमुळे प्रवाशांचा खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 01:18 AM2021-01-08T01:18:04+5:302021-01-08T01:18:10+5:30
कल्याण रेल्वेस्थानकाबाहेरील चित्र : सोशल डिस्टन्सिंग, वाहतुकीचाही वाजला बोऱ्या
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : लॉकडाऊनमध्ये कल्याण रेल्वेस्थानकात संबंधित प्रशासनाने सीलबंद केलेल्या प्रवेशद्वारांपैकी एकच प्रवेशद्वार सद्यस्थितीला सुरू ठेवल्याने पश्चिमेकडील भागातील प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होत आहे. स्थानकाबाहेर पडणारे प्रवासी एकाच प्रवेशद्वारातून येत असल्याने गर्दी वाढून सोशल डिस्टन्सिंगचेही तीनतेरा वाजल्याचे चित्र सकाळ-संध्याकाळ दिसत आहे. रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा स्टॅण्डही सीलबंद असल्याने वाहतुकीचा खोळंबा होऊन महात्मा फुले चौक ते कल्याण बसस्थानक मार्ग परिसरात वाहतूक कोंडीचा सामनाही पादचारी आणि अन्य वाहनांना करावा लागत आहे.
कोरोना रुग्णांमध्ये काहीशी घट झाल्याने रेल्वे प्रशासनाने लांब पल्ल्याच्या मेल, एक्सप्रेस सुरू केल्या असून, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलेल्या लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. ठरावीक वेळेत महिलांनाही लोकलमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. परिणामी लोकलमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे.
मात्र पश्चिमेकडील रेल्वे न्यायालयालगत असलेले मुख्य प्रवेशद्वार वगळता कोरोना काळात सीलबंद केलेले अन्य प्रवेशद्वार प्रशासनाकडून खुले करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वारातूनच प्रवाशांना ये-जा करावी लागत आहे.
महत्त्वाचे म्हणजे रेल्वे स्थानकाबाहेरील सीलबंद केलेले रिक्षास्टॅण्डही खुले करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे बाहेरील रस्त्यावरच रिक्षा उभ्या कराव्या लागत आहेत. यामुळे वाहतूक कोंडीत भर पडतेच, त्याचबरोबर प्रवाशांची गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाही
उडत आहे.
नाहक भरावा लागतोय दंड
रिक्षास्टॅण्ड सीलबंद असल्याने रिक्षा रस्त्यावरच उभ्या कराव्या लागत आहेत. यात रिक्षांची संख्या वाढून अन्य वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. परिणामी वाहतूक नियमन कारवाईत रिक्षाचालकांना दंडात्मक कारवाईला नाहक सामोरे जावे लागत आहे. यामुळे रिक्षाचालकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
आंदोलनाचा दिला इशारा
लॉकडाऊन कालावधीत सीलबंद केलेले रिक्षास्टॅण्ड खुले करावेत, असे पत्र रिक्षा-टॅक्सी चालक-मालक असोसिएशनच्या वतीने मध्य रेल्वेच्या मुख्य स्थानक प्रबंधकांना २२ ऑक्टोबरला देण्यात आले होते. परंतु आजतागायत रिक्षास्टॅण्ड खुले केलेले नाहीत. दरम्यान मंगळवारी पुन्हा एकदा यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला असून सात दिवसात रिक्षास्टॅण्ड खुले न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिल्याची माहिती असोसिएशनचे सहसचिव संतोष नवले यांनी दिली.