नियत साफ असते; दृष्टिकोन साफ असतो तेव्हा धन्याचा धनुभाऊ होतो: धनंजय मुंडे
By प्रशांत माने | Published: February 27, 2023 12:15 AM2023-02-27T00:15:30+5:302023-02-27T00:16:15+5:30
अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती कल्याण यांच्या ३५ व्या वर्धापनदिन कार्यक्रम सोहळयाला धनंजय मुंडे यांनी उपस्थिती लावली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणात मोठे व्हावे हे माझ्या वडीलांचे स्वप्न होते. त्यासाठी माझे वडील चंदनासारखे झीजत राहिले. पण मधल्या काळात घरातून वेगळे झाल्यानंतर विचारधारेतून वेगळे व्हावे लागले. पण विचारधारेतून मी वेगळा झालो नाही मला त्या विचारधारेतून वेगळं केले गेले. त्यानंतर मला समाजाकडून शिव्या पडत होत्या, धण्या शिवाय कोणी नाव घेत नव्हता पण माझी नियत आणि दृष्टीकोन साफ होता. त्यामुळे कालांतराने का होईना धन्याचा धनु भाऊ झाला असा टोला माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी नाव न घेता पंकजा मुंडे यांना लगावला.
येथील अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती कल्याण यांच्या ३५ व्या वर्धापनदिन कार्यक्रम सोहळयाला धनंजय मुंडे यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांचा मुंडे यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सन्मान करण्यापूर्वी मुंडे यांनी स्वत: दराडे यांना फेटा बांधला आणि त्यांचा सत्कार केला. मुंडे भाषणात पुढे म्हणाले खडतर परिस्थितीत घरातला एक व्यक्ती मोठा होत असतो त्यासाठी घरातला एक माणूस झीजत असतो. ते झीजण्याचे काम माङया वडीलांनी केले. पण पुढे वेगळे केल्यानंतर समाज माझ्यावर थुंकत होता, शिव्या देत होता. भक्त म्हणून भगवान गडावर गेल्यानंतरही दगड ही खाल्ली. ही अपमानास्पद वागणूक, संघर्ष माझ्या वाटयाला आला. पण भगवंतावर आणि नियतीवर माझा विश्वास होता. त्यावेळी शरद पवार आणि अजित पवारांनी मोठा आधार दिला.
भगवान गडाचे मठाधिपतीनामी यांना मी सांगितलं होते जोर्पयत मला या ठिकाणी निमंत्रण देणार नाही तोपर्यंत भक्त म्हणून दर्शनाला सुद्धा गडावर येणार नाही पण आज नामदेव शास्त्री बाबांच्या कृपाशीर्वादाने ज्या गडावर मी दगड खाल्ले त्या गडाचा आज मला दगड होता आले याचा मला अभिमान आहे. स्वकर्तुत्वातून समाजाला करून दाखविले त्यानंतर आपल्याला ३५ व्या वर्धापनदिनाला का होईना बोलवावे लागले असे मुंडे म्हणाले. त्यांनी भाषणात वंजारी समाजाला भेडसावणा-या समस्यांबाबतही भाष्य केले. तसेच त्या समस्या सोडवण्याचे आश्वासन देखील त्यांनी समाज बांधवांना दिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"