दिव्यांगांच्या अर्थसाहाय्य वाटपात झाला गैरव्यवहार? केडीएमसीत घेतली धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 12:33 AM2020-12-09T00:33:22+5:302020-12-09T00:33:48+5:30
KDMC News : दिव्यांगांच्या अर्थसाहाय्य वाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत दिव्यांगांनी सोमवारी केडीएमसी मुख्यालयात समाज कल्याण अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी पुरावे सादर करा, चौकशी केली जाईल, असे आश्वासन मनपाने दिव्यांगांना दिले आहे.
कल्याण : दिव्यांगांच्या अर्थसाहाय्य वाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत दिव्यांगांनी सोमवारी केडीएमसी मुख्यालयात समाज कल्याण अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी पुरावे सादर करा, चौकशी केली जाईल, असे आश्वासन मनपाने दिव्यांगांना दिले आहे.
मनपाकडून दिव्यांग कल्याण व पुनर्वसनांतर्गंत पाच लाखांचा निधी दिव्यांगांना दिला जात होता. हा निधी २०१७-१८ मध्ये ६५ जणांना वाटप केल्याची माहिती दिव्यांग पारसनाथ कौल यांनी माहितीच्या अधिकारात घेतली आहे. त्यानंतर त्यांच्या निदर्शनास आले की, अर्थसाहाय्य वाटपाच्या यादीत नोकरी करणारे दिव्यांगही आहेत. त्यामुळे खरे दिव्यांग हे अर्थसाहाय्यापासून वंचित आहेत. मनपाने त्यांचे अर्थसाहाय्याचे प्रस्ताव मंजूर न करता नोकरी करणाऱ्या ३० जणांचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. त्यामुळे मनपाने अर्थसाहाय्य वाटपात गैरव्यवहार केल्याचा आरोप कौल यांनी केला आहे. कौल यांच्याप्रमाणेच अशोक यादव, ज्योती यादव, कल्पना शिंदे, सतीश शिंदे, भारती शहा हे दिव्यांग खरे लाभार्थी असून तेही लाभापासून वंचित आहेत.
मनपाने कौल यांना दिलेल्या माहिती अधिकारातील माहितीत प्रत्येक लाभार्थ्याच्या नावापुढे पाच लाखांऐवजी ५० लाख रुपये, अशी रक्कम वाटप केल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणी प्रशासनाने असे सांगितले की, लिपिक महिला आजारी असल्याने तिच्याकडून ही चूक झाली आहे.