दिवा रेल्वे स्थानकाची वाटचाल अपघात शून्य स्थानकाकडे; गेल्या महिन्याभरात एकही अपघात नाही

By अनिकेत घमंडी | Published: September 18, 2023 07:22 PM2023-09-18T19:22:54+5:302023-09-18T19:23:37+5:30

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश; स्थानकात सरकता जिना बसवल्याने प्रवाशांचे रेल्वे फाटक ओलांडणे बंद.

Diva Railway Station moves towards accident zero station; There is no accident in the last month | दिवा रेल्वे स्थानकाची वाटचाल अपघात शून्य स्थानकाकडे; गेल्या महिन्याभरात एकही अपघात नाही

दिवा रेल्वे स्थानकाची वाटचाल अपघात शून्य स्थानकाकडे; गेल्या महिन्याभरात एकही अपघात नाही

googlenewsNext

डोंबिवली-  सातत्याने रुळ ओलांडताना अपघात होत असल्याने दिवा रेल्वे स्थानकाचे नाव अधिक अपघात होणाऱ्या रेल्वे स्थानकांच्या यादीत येत होते. या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि नागरिकांनी रेल्वे फाटक ओलांडू नये यासाठी स्थानकाच्या पूर्व दिशेला कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांतून स्वयंचलित जिना बसविण्यात आला. त्यामुळे  प्रवाशांचे जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडणे बंद झाले असून गेल्या एक महिन्याच्या कालावधीत इथे एकही रेल्वे अपघाताची नोंद झालेली नाही. याबद्दल सर्वच स्तरातून आणि विशेषतः प्रवाशांकडून खासदार डॉ. शिंदे यांचे आभार मानले जात आहेत.
 
मध्य रेल्वेवरील स्थानकांमध्ये ठाणे, डोंबिवली या स्थानकांबरोबरच दिवा स्थानक हे कायम गर्दीने गजबजलेल्या स्थानकांपैकी एक आहे. या स्थानकातून शहराच्या पूर्वेला जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. मात्र स्थानकाला शहराच्या पूर्व भागाला जोडणाऱ्या पुलावर केवळ दोनच अरुंद जिने असल्याने तिथे कायम चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण होत असते. यामुळे बहुतेक प्रवासी थेट रेल्वे रुळ ओलांडून प्रवास करतात. त्यामुळे आतापर्यंत अनेक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. २०२२ मध्ये रेल्वे रुळ ओलांडताना १७१ प्रवाशांना प्रवाशांनी प्राण गमावले आहेत. २०२३ मध्ये  ऑगस्ट महिन्यापर्यंत ११० प्रवाशांनी दिवा रेल्वे स्थानकात झालेल्या अपघातांमध्ये आपला जीव गमावला आहे. केवळ जुलै महिन्यात २१ प्रवाशांचा दिवा रेल्वे स्थानकात वेगवेगळ्या अपघातात  मृत्यू झाला आहे. अपघातांचे मुख्य कारण हे रेल्वे रुळ ओलांडून प्रवास करणे होते.

दिवा स्थानकात जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी अपुरी व्यवस्था असल्यामुळे बहुतेक प्रवासी  रेल्वे रूळ ओलांडण्याचा पर्याय निवडत होते. दिव्यातील ९० टक्के लोकसंख्या पूर्वेला राहत असूनही या दिशेला तिकिट खिडकी नव्हती. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांनी दिवा स्थानकात पूर्वेला पाहिले टिकिट घर उभारल्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी झाले होते. त्यानंतर दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीनुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिवा पूर्वेला सरकता जिना बसविण्याचे काम मार्गी लावले. गेल्या महिन्यात १६ ऑगस्टला या सरकत्या जिन्याचे लोकार्पण प्रवासी संघटना आणि शिवसेनेच्या वतीने करण्यात आले. यावेळी मध्य रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल आणि इतर अधिकारीही उपस्थित होते. प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत दिवा रेल्वे फटकाची पाहणी करून सरकत्या जिन्याचं पर्याय उपलब्ध झाल्याने रेल्वे फाटक प्रवाशांच्या रहदरीसाठी पूर्णतः बंद करण्याचे निर्देश दिले. १७ ऑगस्ट २०२३ पासून रेल्वे रूळ ओलांडणे पूर्णतः बंद झाल्यामुळे दिवा रेल्वे स्थानकात महिनाभरात रेल्वे रूळ ओलांडताना एकही अपघात झाला नाही. प्रवाशांना सरकत्या जिन्याचा पर्याय मिळाल्याने इतर अरुंद जिन्यांवरील गर्दीही कमी झाली आहे.

दिवा रेल्वे स्थानकात पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही दिशांना चढणारे आणि उतरणारे असे प्रत्येकी २ सरकते जिने बसवण्यात आले आहेत. हे जिने दोन्ही पुलांना जोडण्यात आले असून सोबतच आठही प्लॅटफॉर्मवरून खाली उतरता येऊ नये यासाठी बॅरिकेडिंग केले आहे.  त्यामुळे प्रवाशांना रेल्वे गेटकडे जाताच येणार नाही. तरीही एखादा प्रवासी रुळात आल्यास २४ तास रेल्वे पोलिसांची गस्त असून त्याच्यावर कारवाई केली जात आहे. या उपाययोजनांमुळे गेल्या एक महिन्यात दिवा रेल्वे स्थानकात एकही अपघात झालेला नाही.
- डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Web Title: Diva Railway Station moves towards accident zero station; There is no accident in the last month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.