दिव्यात प्लॅटफॉर्म १ व २ वर लवकरच सरकते जिने, काम लवकरच सुरू होणार
By अनिकेत घमंडी | Updated: August 17, 2023 15:50 IST2023-08-17T15:49:05+5:302023-08-17T15:50:18+5:30
रेल्वे अधिकारी आणि दिवा रेल्वे प्रवासी संघटना पदाधिकारी यांनी संयुक्त पाहणी करून जागा निश्चित केली. दिवा पश्चिमेतील सरकता जिना आठवडाभरात सुरू होणार

दिव्यात प्लॅटफॉर्म १ व २ वर लवकरच सरकते जिने, काम लवकरच सुरू होणार
डोंबिवली: दीवा रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ व २ वरील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मुंबई दिशेकडे देखील एक स्वयंचलित सरकता जिना व्हावा अशी मागणी दिवारेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून केली जात होती. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने प्लॅटफॉर्म क्रमांक १ व २ वरील सरकता जिना सुद्धा मंजूर झाला असून त्यासाठी जागा निश्चित करण्यासाठी आज मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिवा स्थानकाची गुरुवारी पाहणी केली यावेळी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड.आदेश भगत उपस्थित होते.
प्रवासी संघटनेच्या मागणीनुसार दिवा रेल्वे स्थानकात पूर्व दिशेला नवीन संचलित सरकत्या जिन्याचं लोकार्पण झाल्याने दिवेकर रेल्वे प्रवाशांमध्ये एक आनंदाचे वातावरण आहे, शिवाय रेल्वे रूळ ओलांडणे आता १००% बंद झाल्याचा दावा प्रवासी संघटनेने केला आहे. त्यामुळे प्रवाशांना पादचारी पुलावरून जाण्या-येण्यापासून कोणत्याही पर्याय उरलेला नाही. प्रवासी स्वतः पादचारी पुलाचा वापर करत असल्यामुळे दिवा रेल्वे स्थानकातील अपघाताला कायमचा आळा बसणार असे सकारात्मक चित्र तयार झाले आहे.
दिवा पश्चिम येथील तयार होत असलेला सरकता जिना हा देखील लवकर कार्यान्वित व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडे दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असून हा सरकता जिना येत्या आठवड्याभरात प्रवाशांसाठी खुला करणार असल्याचे भगत यांनी सांगितले. दिवेकर रेल्वे प्रवाशांची गरज लक्षात घेता दिवा पश्चिमेतील सरकता जीना हा देखील लवकरात लवकर प्रवाशांसाठी सुरू करावा व फलट क्रमांक १ व २ वरील नवीन सरकत्या जिन्याचं कामाला त्वरित सुरुवात करावी अशी मागणी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती.