संजय राऊतांच्या 'त्या' विधानावर डॉक्टर संतप्त, मग उद्धव ठाकरेंनी काढली समजूत

By मुरलीधर भवार | Published: January 16, 2023 09:10 PM2023-01-16T21:10:51+5:302023-01-16T21:11:56+5:30

राज्यातील विविध डॉक्टर्स आणि त्यांच्या संघटनांपर्यंत संजय राऊत वक्तव्याची माहिती कळताच त्याविरोधात सगळीकडूनच संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या.

Doctors are angry about Sanjay Raut's statement, understanding from Uddhav Thackeray | संजय राऊतांच्या 'त्या' विधानावर डॉक्टर संतप्त, मग उद्धव ठाकरेंनी काढली समजूत

संजय राऊतांच्या 'त्या' विधानावर डॉक्टर संतप्त, मग उद्धव ठाकरेंनी काढली समजूत

googlenewsNext

कल्याण - विरोधी पक्षावर टिका करण्याच्या नादात खासदार संजय राऊत यांनी कोविडमधील राज्यातील डॉक्टर आणि नर्सबाबत केलेल्या विधानावरून डॉक्टरांच्या आयएमएसह प्रमुख संघटनांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ज्यावर थेट पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांनाच डॉक्टरांची समजूत काढावी लागल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवसेनाउद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना 'कोविडच्या सुरुवातीच्या काळात राज्यातील डॉक्टर्स आणि नर्स आपल्या जबाबदारीपासून पळून गेले असे विधान केले होते. 

राज्यातील विविध डॉक्टर्स आणि त्यांच्या संघटनांपर्यंत संजय राऊत वक्तव्याची माहिती कळताच त्याविरोधात सगळीकडूनच संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. विशेषतः कल्याण आणि डोंबिवलीतील डॉक्टर्स आणि त्यांच्या संघटनांनी तर खासदार राऊत यांच्या या वक्तव्यावर नाराजी तर व्यक्त केलीच पण त्याचसोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. 

इंडीयन मेडिकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांच्यापर्यंत या वक्तव्याची माहिती कळताच त्यांनीही यावर आपला रोष व्यक्त केला. तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कल्याणातील नेते विजय साळवी यांच्याशी संपर्क साधून खासदार राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर परखडपणे आपला निषेध नोंदवला. कोविडच्या सुरुवातीपासून कल्याण डोंबिवलीतील खासगी डॉक्टरांनी डॉक्टर आर्मी स्थापन करून केलेल्या कामाची आठवण करून दिली. डॉ. प्रशांत पाटील यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून डॉक्टरांच्या नाराजीची माहिती दिली. पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांनीही त्याची तातडीने दखल घेतली. त्यानंतर मग अचानक सगळी चक्रे फिरली आणि उद्धव ठाकरे यांनी थेट इंडीयन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांच्याशी संपर्क साधत विचारणा केली. 

त्यावर डॉ. प्रशांत पाटील यांनी महविकास आघाडी सरकार असताना कोविड काळात डॉक्टर आर्मीच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीतील खासगी डॉक्टरांनी केलेल्या कामाची आठवण करून दिली. तसेच खासदार राऊत यांनी डॉक्टर आणि नर्सबाबत असे विधान करावयास नको होते, असे उद्धव ठाकरे यांना सांगितले. हे सर्व म्हणणे ऐकून घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही खासगी डॉक्टर आणि त्यांच्या संघटनानी कोविड काळात केलेल्या कामाबाबत सहमती दर्शवली. तसेच आपला राज्यातील सर्व डॉक्टर आणि त्यांच्या संघटनांवर विश्वास आणि त्यांच्याप्रती मनामध्ये आदर असल्याचे सांगत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या वादावर पडदा टाकल्याची माहिती आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगितले.

Web Title: Doctors are angry about Sanjay Raut's statement, understanding from Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.