कुणी पाणी देतं का पाणी... माजी उपमहापौरांनाच भरावं लागतंय टँकरनं पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 04:21 PM2021-04-14T16:21:31+5:302021-04-14T16:29:56+5:30
शहरातील लोकप्रतिनिधींचीच अवस्था अशी असेल तर सामान्य नागरिकांनी काय करावं?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एमआयडीसी आणि केडीएमसी प्रशासन एकमेकांकडे बोटं दाखवत असून आंदोलन आणि मोर्चे काढून नागरिकही हैराण झाले आहेत.
ठाणे - कल्याण-डोंबिवली शहरानजीक असलेल्या 27 गावांत पाणीप्रश्न चांगलाच पेटलाय. काही दिवसांपूर्वी नगरसेविका सुनीता पाटील यांनी पाणी टंचाईवरुन तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सध्या या भागात टँकरने पाणी विकत घ्यावे लागत असून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक तथा माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनाही आपल्या घरात टँकरने पाणी आणावं लागतंय. भोईर यांचा टँकरने पाणी भरतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
शहरातील लोकप्रतिनिधींचीच अवस्था अशी असेल तर सामान्य नागरिकांनी काय करावं?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एमआयडीसी आणि केडीएमसी प्रशासन एकमेकांकडे बोटं दाखवत असून आंदोलन आणि मोर्चे काढून नागरिकही हैराण झाले आहेत. कोरोना काळात पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू असून या परिसरातील लोकप्रतिनिधीही हतबल झाले आहेत. लोकप्रतिनिधीनाच टॅंकरने पाणी विकत घ्यावं लागतंय, अशी बिकटं अवस्था ग्रामीण परिसरात उदभवलीय. त्यामुळे, कुणी पाणी देतं का पाणी... असं म्हणायची वेळ नागरिकांसह नेतेमंडळींवरही आली आहे.
दरम्यान, सामान्य नागरिक वारंवार पाणी विकत घेण्यासाठी पैसे कुठून आणणार? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. कोरोना संकटामुळे अगोदरच नागरिकांची आर्थिक घडी विस्कटली असून पाण्यासाठी लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. त्यामुळे, नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.