Dombivali: डोंबिवली एमआयडीसी फेज दोनमधील न्यू अर्गा कंपनीला आग
By सचिन सागरे | Published: July 7, 2024 06:11 PM2024-07-07T18:11:08+5:302024-07-07T18:11:37+5:30
Dombivali Fire News: एमआयडीसी फेज दोनमधील न्यू अर्गा केमिकल कंपनीमध्ये शॉर्टसर्किटमुळे रविवारी दुपारच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. मात्र आग कंपनीच्या रिऍक्टरपर्यंत पोहोचण्याआधी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली.
- सचिन सागरे
डोंबिवली - एमआयडीसी फेज दोनमधील न्यू अर्गा केमिकल कंपनीमध्ये शॉर्टसर्किटमुळे रविवारी दुपारच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. मात्र आग कंपनीच्या रिऍक्टरपर्यंत पोहोचण्याआधी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. आगीची माहिती मिळताच कंपनीत काम करणारे कामगार कंपनी बाहेर पडल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
न्यू अर्गा केम या कंपनीमध्ये कपड्याच्या प्रिंटींगसाठी लागणारे रंग बनवण्याचे काम केले जाते. रविवारी दुपारी दोनच्या सुमारास या कंपनीला आग लागल्याची घटना घडली. कंपनीत असलेले केमिकलचे ड्रम फुटल्याने मोठा आवाज झाला. काही क्षणात आग कंपनीत पसरली. आग लागल्याचे लक्षात येताच कंपनीमध्ये काम करणाऱ्या सहा कामगारांनी कंपनी बाहेर पळ काढला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ही आग कंपनीच्या रिऍक्टरजवळ पोहोचत असतानाच अग्निशमन विभागाने अवघ्या काही मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागण्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन विभागाने व्यक्त केला आहे.