डोंबिवली : महावितरणच्या तांत्रिक बिघाडीचा पूर्वेकडील २५ हजार ग्राहकांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 01:27 PM2021-07-30T13:27:39+5:302021-07-30T13:30:44+5:30
मुख्य वाहिनीत तांत्रिक बिघाड. इनकमर झाला फेल.
डोंबिवली: वीजबिल भरण्यात राज्यात अग्रेसर असलेल्या डोंबिवली शहरात या आठवडभरात ठिकठिकाणी विजेचा।लपंडाव सुरू असून त्याचा फटका वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या अशा लाखो नागरिकांना बसत आहे. शुक्रवारीही एमआयडीसीनजीक घरडा सर्कल येथील महावितरणच्या मुख्य विजवाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने २५ हजार ग्राहकांना म्हणजेच ५० हजाराहून अधिक जणांना त्याचा त्रास झाला.
सोमवारपासून शहरात विविध ठिकाणी विजेची समस्या निर्माण झाली असून शुक्रवारी रामनगर, गणेश मंदिर, राजाजी पथ यांसह फडके पथ, मानपाडा रस्त्याचा काही भाग, शिवमंदिर पथ वरील काही भाग, टंडन पथवरील ग्राहक आदींना त्याचा फटका बसला. सकाळपासून दोन, तीन वेळा वीज खंडित झाली, त्यानंतर ११.३० वाजेपासून वीज सुमारे दोन तास खंडित झाली होती.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, घरडा सर्कल जवळ मुख्य वाहिनीचा इनकमर फेल झाला, मात्र समस्या नेमकी काय होती, कुठे होती हे शोधण्यात वेळ गेल्याने सुमारे २५ हजार ग्राहक प्रभावित झाले होते. दुपारी १२.३०च्या सुमारास बिघाड कुठे झाला हे निदर्शनास आले, दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.