पुन्हा डोंबिवली..! एमआयडीसीत अग्नितांडव, नागरिकांमध्ये घबराट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 08:02 AM2024-06-13T08:02:01+5:302024-06-13T08:02:16+5:30
Dombivali MIDC Blast: डोंबिवली येथील एमआयडीसीतील अमुदान (अंबर) या रासायनिक कंपनीत रिॲक्टरच्या भीषण स्फोटाच्या घटनेला जेमतेम २० दिवस होत नाहीत तोच बुधवारी सकाळी डोंबिवलीतील एमआयडीसी पुन्हा एकदा अग्नितांडव आणि स्फोटाच्या आवाजाने हादरली. इंडो अमाइन या कंपनीच्या रसायन साठ्याने पावणेअकराच्या सुमारास पेट घेतला.
डोंबिवली - येथील एमआयडीसीतील अमुदान (अंबर) या रासायनिक कंपनीत रिॲक्टरच्या भीषण स्फोटाच्या घटनेला जेमतेम २० दिवस होत नाहीत तोच बुधवारी सकाळी डोंबिवलीतीलएमआयडीसी पुन्हा एकदा अग्नितांडव आणि स्फोटाच्या आवाजाने हादरली. इंडो अमाइन या कंपनीच्या रसायन साठ्याने पावणेअकराच्या सुमारास पेट घेतला. आगीची झळ शेजारील अभियांत्रिकी कंपनीलाही बसली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, एकापाठोपाठ एक होणाऱ्या आग आणि स्फोटांच्या घटनांमुळे डोंबिवलीकरांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
इंडो अमाइन या कंपनीत रसायनांचा साठा करून ठेवला होता. त्याला बुधवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे कंपनीत आगीचा भडका उडून स्फोटांचे आवाज होऊ लागले. परिसरातील नागरिकांच्या अवघ्या तीन आठवड्यांपूर्वी झालेल्या अमुदान कंपनीतील स्फोटांच्या कटु आठवणी जागृत झाल्या. सर्वत्र घबराट निर्माण झाली. अनेकांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली.
स्फोटानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना घरी पाठविले
आगीच्या ज्वाळांनी शेजारील माल्दा इंजिनीअरिंग या कंपनीलाही कवेत घेतले. आजूबाजूच्या कंपन्यांतील कामगारांनी प्रसंगावधान राखत सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. दुर्घटनाग्रस्त कंपनीच्या नजीकच अभिनव विद्यालय आहे.
स्फोटानंतर या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठविण्यात आले. इंडो अमाइन कंपनीत कोणीही कामगार नसल्याने जीवितहानी टळली. आगीचे आणि धुराचे लोट आसमंतात दूरवरून दिसत होते.
जळालेल्या रसायनाचा उग्र दर्पही परिसरात दीर्घकाळपर्यंत भरून राहिला होता. मंत्री रवींद्र चव्हाण, महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड, पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, उद्धवसेनेच्या वैशाली दरेकर, माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे आदींनी घटनास्थळाची पाहणी केली.
लागले चार तास
आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. शर्थीच्या प्रयत्नांनंतर दुपारी ३ वाजता आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. रात्री उशिरापर्यंत कूलिंगचे काम सुरू होते.
स्कूल व्हॅन जळून खाक
कंपनीला लागलेल्या आगीत या परिसरात असलेल्या अभिनव शाळेच्या तीन ते चार स्कूल व्हॅन जळून खाक झाल्या. एमआयडीसी परिसरातील झाडेही जळून गेली. रस्ते, नाल्यांत रसायन कंपनीतील रसायनांनी भरलेले ड्रम बाहेर काढले. मात्र, यातील रसायन रस्त्यावर सांडले होते, तसेच नाल्यातून हे रसायन वाहत असल्याने नाल्यातील पाण्याला विविध रंग आले होते.
परिसरात घबराट
अमुदान कंपनीतील आगीच्या आणि स्फोटाच्या आठवणी ताज्या असल्याने कंपनीच्या परिसरात घबराटीचे वातावरण होते. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना रसायनांच्या उग्र दर्पामुळे त्रास जाणवत होता. अनेक ठिकाणी वीज प्रवाहही खंडित झाला होता.