डोंबिवली : पावसाळ्याच्या शुभारंभालाच नांदिवली, म्हात्रेनगर, महात्मा फुले पथ पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 07:35 PM2021-06-09T19:35:18+5:302021-06-09T19:37:29+5:30
Heavy Rainfall : रहिवाशांना करावा लागला समस्यांचा सामना. आयुक्तांकडून पाहणी का नाही, नागरिकांचा सवाल
डोंबिवली: हवामान खात्याने जाहीर केल्यानुसार बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावत नागरिकांची दाणादाण उडवून दिली. पहाटेपासून पावसाचा जोर कायम होता, तो दुपारी ३ वाजेनंतर काहीसा कमी झाला. त्या कालावधीत पडलेल्या या मोसमातील पहिल्याच पावसाने म्हात्रेनगर, नांदिवली, महात्मा फुले पथ आणि ठाकुर्लीचा काही भाग पाण्याखाली गेला. नालेसफाई असेल अथवा महापालिकेने केलेली नाल्याची अर्धवट कामे यामुळे ही स्थिती ओढवली असून नागरिकांना मात्र त्याचा थेट फटका बसला आहे.
म्हात्रेनगर येथे कोपर रेल्वे स्थानकालगत पूर्वेला असलेल्या नाल्याचे तोंड अरुंद असल्याने पहिल्याच पावसात त्या भागात बहुतांशी सोसायट्यांची एंट्री पाण्याखाली होती,जर पावसाचा जोर सतत तीन दिवस असाच राहिला तर मात्र अनेकांची घर पाण्याखाली जातील अशी भीती माजी नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी व्यक्त केली. नांदीवली भागात देखील श्री स्वामी समर्थ नगरमध्ये अशीच स्थिती असल्याने गतवर्षी प्रमाणेच रस्त्यावर पाणी भरले आणि नागरिकांची पायवाट बंद झाली. शेकडो रहिवाशांचे त्यात हाल झाले. अनेकांनी आमदार राजू पाटील यांना संपर्क साधून पावसाच्या पाण्यामुळे जे हाल सुरू आहेत त्याचे फोटो, व्हिडिओ पाठवून या गैरसोयीतून सोडवण्याची मागणी केली. वर्षानुवर्षे केवळ आश्वासन मिळत असून महापालिका काहीही उपाययोजना करत नसल्याने आमच्या घरांचे नुकसान होत असल्याची भावना रहिवाशांमध्ये आहे.
तर सदोष मनुष्यवधाचा दाखल करू
आता तर पहिलाच पाऊस होता, आणखी साडेतीन महिने जायचे आहेत, कसे होणार याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली. महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी हे पाहणीसाठी का आले नाही? असा सवाल त्रस्त नागरिकांनी केला. पश्चिमेला देखील पाच महिन्यांपासून महात्मा फुले रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटचे काम सुरू आहे. सुरुवातीपासूनच काम संथ गतीने सुरू असल्याने बुधवारच्या पावसात तेथे नदीचे स्वरूप आल्यासारखी स्थिती होती. त्यावर मनपाच्या उपभियंत्याना नागरिकांनी प्रश्न विचारले पण ते निरुत्तर होते. कंत्राटदार घटनास्थळी नव्हता, त्याचे कामगार नागरिकांना उडवाउडवीची उत्तर देत असल्याने वातावरण तापले असल्याची माहिती रहिवासी आणि पश्चिमेकडिल रिक्षा चालक मालक संघटनेचे उपाध्यक्ष शेखर जोशी यांनी दिली. जर या स्थितीमुळे कोणाचा अपघात झाला तर मात्र कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे जोशी म्हणाले.
अनेक रस्ते जलमय
वेळोवेळी सूचना देऊनही महापालिका, संबंधित कंत्राटदार आदीनी न ऐकल्याने गंभीर स्थिती ओढवल्याची टीका जोशी यांनी केली. तसेच जर तात्काळ उपाययोजना करून पाणी साठू नये असे नियोजन न केल्यास पावसातच त्या पाण्यात बसून रिक्षा चालक आंदोलन करतील असा इशारा देखील त्यांनी दिला. अशाच पद्धतीने मानपाडा रस्त्यावर ग, फ प्रभाग समिती कार्यालयाजवळ पाणी साचले होते. ठाकुर्ली भागात देखील सखल भागात पाणी साचल्याने चिखल झाला होता. एमआयडीसीत अंतर्गत रस्त्यावर तळे साचले होते, त्यामुळे नागरिक, वाहनचालक त्रस्त झाले. तेथील सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी त्याबाबतचे दृश्य, छायाचित्र ठिकठिकाणी पाठवून जनजागृती करून मदतीची अपेक्षा केली. तेथे एम्स हॉस्पिटल रस्ता, हायवेचा सर्व्हिस रस्ता, वंदे मातरम् उद्यान, स्टरलींग पॅलेस सोसायटी समोर इत्यादी ठिकाणी पाणी तुंबले होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची असुविधा झाली होती. भोपरमध्ये देखील पाणी साचले होते, सामाजिक कार्यकर्ते अमर माळी आणि त्यांच्या सहकार्यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले, तसेच मनपाला पाणी साचल्यासंदर्भात सूचित केले होते.
नांदीवली भागात पाणी समस्या होऊ नये यासाठी मी स्वतः आयुक्तांना भेटून माझा कोट्यवधी रुपयांचा आमदार निधी देण्यात येईल असे सांगितले. पण त्यांनी नकार दिला. पण त्यांनीही वर्षभरात काही केलेले नाही, त्यामुळे आता पहिल्या पावसात नागरिकांचे हाल सुरू झाले, त्यांच्या नुकसानीची जबाबदारी आयुक्त घेणार आहेत का? त्यांच्याकडे निधीची कमतरता समजू शकतो, पण मग माझा निधी नाकारण्याचे कारणच काय होते?
राजू पाटील, आमदार
म्हात्रे नगर मध्ये पुन्हा एकदा पंपिंग स्टेशनमधील यंत्रणा बंद पडल्याचे दिसून आले. दोन वर्षांपूर्वी स्वतः महापौर विनीता राणे, विश्वनाथ राणे तेथे येऊन पंप सुरू केले होते, पण आता ते बंद असल्याने शहरातून पावसाच्या आलेल्या पाण्याचा निचरा वेगाने होत नसल्याने त्यात नव्याने केलेल्या नाल्याच्या कामातील चुकांचा फटका रहिवाश्यांना बसत आहे. आयुक्त सूर्यवंशी वेळीच याची दखल घेतील का?
विशू पेडणेकर, माजी नगरसेवक