Dombivali: नेतीवली टेकडी, वृक्ष संवर्धनासाठी संरक्षक भिंत आवश्यक, अभ्यासकांनी मांडल्या सूचना
By अनिकेत घमंडी | Published: May 7, 2024 01:18 PM2024-05-07T13:18:10+5:302024-05-07T13:21:04+5:30
Dombivali News: डोंबिवली शहर परिसरातील एकूणच पर्यावरणीय परिस्थितीचा धांडोळा घेण्याच्या उद्देशाने नानासाहेब पुणतांबेकर स्मृती न्यास तसेच डोंबिवली शहरातील असंख्य निसर्ग प्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन निसर्ग शिक्षणाचे प्राथमिक धडे इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायरमेंटल आर्किटेक्चर अँड रिसर्च या संस्थेद्वारा देण्यात आले.
- अनिकेत घमंडी
डोंबिवली - शहर परिसरातील एकूणच पर्यावरणीय परिस्थितीचा धांडोळा घेण्याच्या उद्देशाने नानासाहेब पुणतांबेकर स्मृती न्यास तसेच डोंबिवली शहरातील असंख्य निसर्ग प्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन निसर्ग शिक्षणाचे प्राथमिक धडे इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायरमेंटल आर्किटेक्चर अँड रिसर्च या संस्थेद्वारा देण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने नेतीवली टेकडीला संरक्षक भिंत बांधणे गरजेचे असून टेकडी संवर्धन आणि पर्यावरणाच्या दृष्टीने झाडे कोणकोणती लावावीत याचा एकत्रित विचार करण्यात आला. याच निमित्ताने औद्योगिकीकारणांमुळे वाढलेले प्रदूषण, डोंबिवली परिसरातील हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने काय आणि कसे प्रयत्न करता येतील याबाबत चर्चा होऊन, सिटी फॉरेस्ट संकल्पने अंतर्गत तयार होणाऱ्या मानवनिर्मित वनासाठी स्वतःचे योगदान कशा प्रकारे देता येईल याबाबत काही मान्यवरांनी त्यांचे विचार व्यक्त केले. सिटी फॉरेस्ट या संकल्पने वर आधारित माहिती शिक्षण व प्रशिक्षण घेण्यात आले.
डोंबिवली शहरातील मिलापनगर परिसरातील आकारास येत असलेल्या शैलगंगा सिटी फॉरेस्ट प्रकल्पाच्या आयोजनाच्या निमित्ताने, शहरीवन म्हणजेच सिटी फॉरेस्ट ही संकल्पना काय असते, डोंबिवली शहरांसाठी सिटी फॉरेस्ट प्रकल्पाचे महत्व आणि त्याची अनिवार्यता, डोंबिवली शहरात आकारास येणाऱ्या सिटी फॉरेस्ट प्रकल्पाचे वैशिष्ट्यपूर्ण आयोजन आणि अंमलबजावणी, अशा सर्व मुद्द्यांवर संपूर्ण माहिती देऊन त्यावर साधक-बाधक चर्चा करण्यात आली. या चर्चासत्राच्या निमित्ताने एकत्र आलेल्या नागरिकांनी सिटी फॉरेस्ट या संकल्पना समजून घेताना सोबतच येत्या पावसाळ्यात सिटी फॉरेस्ट संकल्पने अंतर्गत तयार केल्या जाणाऱ्या या मानवनिर्मित वनामध्ये अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात येणार आहेत, ज्याची सविस्तर माहिती आयईएआर संस्थेच्या वतीने पर्यावरण तज्ञ व प्रकल्प समन्वयक अविनाश कुबल यांनी उपस्थितांना करून दिली. त्या चर्चासत्राला नानासाहेब पुणतांबेकर स्मृती न्यासचे अध्यक्ष डॉ. सुनील पुणतांबेकर, विश्वस्त विवेक लिमये, आयइएआर संस्थेचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव तायशेटे, सचिव डॉ. साधना महाशब्दे, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्टचे दीपक काळे, पर्यावरण दक्षता मंडळ डोंबिवली केंद्राच्या प्रमुख रूपाली शाइवाले, न्यास ट्रस्टचे प्रमुख विश्वास भावे, डोंबिवलीतील प्रथितयश आयुर्वेदतज्ञ वैद्य नरहर प्रभू यांसह मान्यवर उपस्थित होते.