बारबालेवर जडला जीव! घरफोडया करून ‘त्या’ पैशांची करायचा उधळण

By प्रशांत माने | Published: August 9, 2023 04:25 PM2023-08-09T16:25:47+5:302023-08-09T16:27:31+5:30

कल्याण डोंबिवलीत घरफोडी गुन्हयांचे प्रमाण वाढले आहे. याच्या तपासकामी पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी कल्याण डोंबिवलीत विशेष पथके नेमली आहेत.

dombivali police arrest two People for theft | बारबालेवर जडला जीव! घरफोडया करून ‘त्या’ पैशांची करायचा उधळण

बारबालेवर जडला जीव! घरफोडया करून ‘त्या’ पैशांची करायचा उधळण

googlenewsNext

डोंबिवली: एकीकडे कल्याण डोंबिवलीत घरफोडीच्या घटनांचे सत्र सुरू असताना दुसरीकडे डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. यूसूफ रशिद शेख (वय २८) आणि नौशाद मुस्ताक आलम उर्फ सागर ( वय २८) अशी दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून १८ गुन्हयांची उकल झाली आहे. धक्कादायक म्हणजे मुंबईतील एका डान्सबारमधील बारबालेवर यूसूफचा जीव जडला. आतापर्यंत त्याने तिच्यावर ५० लाख रुपयांची उधळण केल्याची माहीती पोलिस सूत्रांनी दिली. केवळ तिच्यावर पैसे उधळण्यासाठी यूसूफ घरफोडीचे गुन्हे करीत होता आणि त्याला मित्र नौशादची साथ लाभत होती.

कल्याण डोंबिवलीत घरफोडी गुन्हयांचे प्रमाण वाढले आहे. याच्या तपासकामी पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी कल्याण डोंबिवलीत विशेष पथके नेमली आहेत. डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलिस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुरेश मदने, सहाय्यक पोलिस निरिक्षक सुनिल तारमळे, अविनाश वनवे आणि प्रशांत आंधळे या अधिका-यांच्या पथकांचा घरफोडी गुन्हयांचा तपास सुरू होता. या तीन पोलिस अधिका-यांच्या पथकाने केलेल्या तपासात नवी मुंबईतील घणसाेली परिसरात राहणा-या यूसूफ आणि त्याचा मित्र नौशादला टिटवाळा, बनेली परिसरातून अटक केली गेली.

दोघांच्या तपासात ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई पोलिस आयुक्तालयातील १८ गुन्हे उघडकीस आणण्यात पथकांना यश आले आहे. दोघांकडून पोलिसांनी मोठया प्रमाणात सोने चांदीचे दागिने, रोकड, लॅपटॉप, घडयाळ, मोबाईल, कॅमेरा सह चोरी करण्यासाठी वापरलेले साहीत्य असा २० लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर यूसूफला २३ तर नौशादला ११ घरफोडीच्या गुन्हयांमध्ये आधी अटक करण्यात आल्याची माहीती प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मदने यांनी दिली.

Web Title: dombivali police arrest two People for theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.