टाकाउतून टिकाऊ : डोंबिवलीकर अशोक बरवे यांनी साकारली अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 01:14 PM2021-03-09T13:14:46+5:302021-03-09T13:15:46+5:30
पुठ्ठा, कागद यापासून सव्वा फूट साकारले मंदिर; शस्त्रक्रियेनंतर बेडरेस्टमधून सुचली कल्पकता
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली: अयोध्येत राम जन्मभूमीवर श्रीरामाचे भव्य-दिव्य मंदिर उभे राहात असून ते आगामी काही वर्षांत पूर्णत्वास जाईल. मात्र त्या आधीच ते।मंदिर कसे असेल तेथील मंदिर पूर्ण होण्याआधी डोंबिवलीतील अशोक बरवे यांनी त्याची हुबेहुब प्रतिकृती तयार केली आहे. त्यांनी हे काम त्यांच्यावर झालेल्या एका मोठ्या शस्त्रक्रियेनंतर जो चार महिन्यांचा काळ सक्तीची विश्रांती म्हणून घरात बसून घालवावा लागला त्या काळात केले आहे.
कोणताही विशेष खर्च न करता टाकाऊतून टिकाऊ यातून बरवे यांनी एक ते सव्वा फूट उंचीची प्रतिकृती तयार केली आहे. २९ ऑक्टोबर रोजी बरवे यांच्या उखळीच्या सांध्याची पुन: एकदा शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ४ महिने त्यांना बेडरेस्ट सांगितली होती. बरवे यांच्यासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्याही हा काळ बिकट होता. मन शरीरापासुन दूर नेण्यासाठी बरवे यांनी त्याकाळात भरपूर वाचन केलेच पण मोबाइलवर चित्रपट, व्याख्याने,वेबसिरीजही पाहिल्या. मात्र नंतर त्याचाही कंटाळा आला. सुमारे तीन महिन्यानंतर ते बसायला।लागले. तेव्हा काहीतरी वेगळे करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. त्याचवेळी अयोध्येतील नियोजित श्रीराम मंदिराची चित्रे, दृकश्राव्य ध्वनिचित्रफीती आणि अन्य काही लेखन त्यांच्या पाहण्यात, वाचनात आले. आणि बरवे यांनी अयोध्येतील नियोजित भव्य श्रीराम मंदिराचीच प्रतिकृती तयार करण्याचा चंग बांधला. नियोजित मंदिर, त्याविषयीची चित्रे, दृकश्राव्य ध्वनिचित्रफीती हे सतत काही वेळा पाहून, त्यावर चिंतन, अभ्यास करून मंदिराचा आराखडा आधी कागदावर तयार केला. त्यानंतर जुन्या रद्दी वह्यांमधील पाने घेऊन त्याच्या घट्ट सुरनळ्या तयार करून मंदिराचे खांब तयार केले. तयार शर्ट, मिठाईचे खोके यापासुन बाकीचे बांधणी काम उभे केले. हे सर्व पूर्ण झाल्यावर ॲक्रॅलीक रंगाने संपूर्ण मंदिर रंगविले. आणखी काहीतरी वेगळे करावे या हेतूने त्यांनी वेगवेगळ्या आकाराचे जुन्या इमीटेशन ज्वेलरीमधील मणी त्या मंदिरावर चिकटवून त्याला आणखी आकर्षक रुप दिले. श्रीरामाच्या प्रेरणेने आणि आशीर्वादानेच हे कार्य हातून घडले, असे बरवे यांनी सांगितले. आता नवी दिल्ली येथील 'अक्षरधाम'ची प्रतिकृती तयार करण्याचा बरवे यांचा मानस असल्याचे ते म्हणाले.
बरवे याना ती प्रतिकृती साकारण्यासाठी महिना लागला, फेब्रुवारीमध्ये त्यांनी त्या कामाला सुरुवात केली. सगळं साहित्य मिळून अवघे १०० रुपये किंवा त्याहून कमीच लागल्याचे ते म्हणाले. रोज दोन तास त्यासाठी देऊन काम ७ मार्च रोजी पूर्ण झाल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.