Dombivali: रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचं काम श्रीकांत शिंदे यांनी हाती घ्यावा
By मुरलीधर भवार | Published: August 3, 2024 07:13 PM2024-08-03T19:13:49+5:302024-08-03T19:15:18+5:30
Shrikant Shinde News: रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हाती घ्यावे अशी मागणी शिंदे सेनेकडून करण्यात आली आहे. शिंदे सेना आणि भाजप सरकारमध्ये असताना शिंदे सेनेच्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
- मुरलीधर भवार
डोंबिवली - रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हाती घ्यावे अशी मागणी शिंदे सेनेकडून करण्यात आली आहे. शिंदे सेना आणि भाजप सरकारमध्ये असताना शिंदे सेनेच्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे शिंदे सेनेच्या मनात नेमके चालले तरी काय आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शिंदे सेनेचे उप जिल्हा प्रमुख राजेश कदम, शहर प्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक विश्वनाथ भोईर, पदाधिकारी संतोष चव्हाण, विवेक खामकर आणि रमाकांत देवळेकर यांनी ही मागणी केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही मागणी करण्यात येणार आहे. या मागणीचे एक निवेदन पदाधिकाऱ्यांनी खासदार शिंदे यांना डोंबिवली शहर शाखेत दिले आहे. खासदार शिंदे यांनी खासदार पदाच्या तीन टर्ममध्ये कल्याण लोकसभा मतदार संघातील गेम चेंजर प्रकल्प मार्गी लावले आहेत.
काही प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे. एक वेगळा पर्याय म्हणून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम खासदार शिंदे यांनी हाती घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. डोंबिवली विधानसभा मतदार संघातून तीन वेळा आमदार पदी निवडून आलेले भाजप आमदार रविंद्र चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे. त्यांच्याकडे मुंबई गोवा महामार्गाची जबाबदारी आहे. या कामावर ते लक्ष ठेवून आहेत. विधानसभा निडणूकीत शिंदे सेनेने अशा प्रकारची मागणी करुन डोंबिवली विधानसभा मतदार संघावर दावा सांगण्याचा संकेत दिला आहे का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. या मागणीचा केंद्रीय मंत्री गडकरी आणि मुख्यमंत्री शिंदे हे काय विचार करतात. तसेच या मागणीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण हे काय प्रतिक्रिया देतात. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.