रासायनिक कंपन्यांच्या स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू; कंपनी मालकांकडून माहिती घेण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 09:50 AM2024-05-30T09:50:26+5:302024-05-30T09:50:50+5:30

‘अमूदान’ कंपनी स्फाेट प्रकरण: तपशीलवार माहिती गोळा करण्याचे काम सुरू

Dombivli Blast Case Process of relocation of chemical companies begins Start taking information from company owners | रासायनिक कंपन्यांच्या स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू; कंपनी मालकांकडून माहिती घेण्यास सुरुवात

रासायनिक कंपन्यांच्या स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू; कंपनी मालकांकडून माहिती घेण्यास सुरुवात

लाेकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: कंपनीचे नाव, कंपनीची उत्पादने, कंपनीचे क्षेत्रफळ, कामगारांची संख्या, कंपनीचे स्थलांतर करायचे झाल्यास किती जागा लागेल या व अशा माहितीचे अर्ज डोंबिवलीतील कंपन्यांकडून भरून घेतले जात असल्याने डोंबिवलीतील रासायनिक कंपन्यांना लवकरच आपला गाशा गुंडाळावा लागेल, अशी आशा पल्लवित झाली आहे. सरकारने तातडीने ही माहिती संकलित करून रासायनिक कंपन्यांना पाताळगंगा येथे स्थलांतरित करावे, अशी एकमुखी मागणी डोंबिवलीकर करीत आहेत.

डोंबिवली एमआयडीसी फेज-१ आणि फेज-२ या दोन टप्प्यांत ७५१ कंपन्या आहेत. त्यापैकी ११५ कंपन्या या टेक्सटाइलच्या आहेत. त्या ठिकाणी कापड प्रक्रिया उद्योग चालविला जाताे, तर १२५ कंपन्या रासायनिक आहेत.  गेल्या ४० पेक्षा जास्त वर्षांत नागरी वस्ती वाढली. नागरी वस्तीतील इमारती आणि घरे बांधण्यासाठी परवानगी देताना पालिका प्रशासन, एमआयडीसीने बफर झोन  ठेवण्याची काळजी घेतली नाही. त्याचबरोबर प्रदूषणाचा प्रश्नही नागरिकांना भेडसावत आहे. कंपन्या स्थलांतरित करण्याचा मुद्दा महाविकास आघाडीच्या सरकारने हाती घेतला होता. पाताळगंगा येथे विशेष झोन करून रासायनिक कंपन्या हलविण्याचे ठरवले होते. मात्र, त्यानंतर सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने रासायनिक कंपन्यांना संरक्षण दिले.

तपशीलवार माहिती गोळा करण्याचे काम सुरू

डोंबिवली एमआयडीसीतील ७५१ कंपन्यांची माहिती कंपनी मालकांकडून भरून घेण्यास सुरुवात झाली. सगळ्या कंपनी मालकांना एमआयडीसीकडून एक फॉर्म दिला गेला आहे. त्यात कंपनीचे नाव, कंपनीत तयार केले जाणारे उत्पादन, कंपनी ज्या ठिकाणी आहे त्या जागेचे क्षेत्रफळ किती, कंपनी स्थलांतरित करायची झाल्यास अन्य ठिकाणी कंपनीकरिता किती  जागा लागेल, सध्या असलेली जागा कमी असल्यास स्थलांतरित झालेल्या ठिकाणी जास्तीचा जागा लागेल का? आदी तपशीलवार माहिती भरून द्यायची आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर डोंबिवलीतील धोकादायक कंपन्या पाताळगंगा किंवा अंबरनाथ येथे हलविण्यात येणार आहेत.

मलय, स्नेहा मेहताला २ दिवसांची पोलिस कोठडी

डोंबिवलीतील अमुदान कंपनीतील स्फोटाकरिता अटक केलेले कंपनीचे मालक मलय मेहता आणि त्याची पत्नी स्नेहा मेहता या दोघांची कल्याण न्यायालयाने दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली. मलय गेली पाच दिवस पोलिस कोठडीत होता.  स्नेहा हिला मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. स्फोटाच्या दुसऱ्याच दिवशी कंपनी मालक मलय याला पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची कोठडी सुनावली. मलयसह स्नेहाला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पाेलिस कोठडी सुनावल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली. 

कंपनीतील उत्पादन ते विक्रीचा तपास

कंपनी कोणत्या प्रकारचे उत्पादन घेत होती, त्यासाठी कच्चा माल कुठून आणत होते. त्यासाठी तो माल कुठे पाठविला जात होता, कंपनीतील यंत्र सामग्रीची परवानगी होती का नाही. उत्पादन प्रक्रियेसाठी आवश्यक त्या सरकारी यंत्रणांच्या परवानग्या घेतल्या होत्या की नाही,  याचा तपास पोलिसांना करायचा आहे. त्यासाठी आरोपीची पोलिस कोठडी वाढवून द्या, अशी मागणी तपास अधिकाऱ्यांनी केली. मलय आणि स्नेहा हे दोघे कंपनीचे संचालक आहेत. मृत्युमुखी पडलेल्या ३ जणांची ओळख पटली आहे. बाकीच्या मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी नातेवाइकांची डीएनए टेस्ट केली आहे.

Web Title: Dombivli Blast Case Process of relocation of chemical companies begins Start taking information from company owners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.