डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण अधिकारी गिरीश बने यांची दबंगगिरी - भाजपचा आरोप
By अनिकेत घमंडी | Published: April 13, 2024 06:51 PM2024-04-13T18:51:09+5:302024-04-13T18:51:25+5:30
नियंत्रण नसल्याने शहरात वाहतूक कोंडी अधिकारी म्हणतात नियमबाह्य कारवाईलाच विरोध
डोंबिवली: शहर वाहतूक नियंत्रण शाखेचा कारभार पोलीस निरीक्षक गिरीश बने यांनी हातात घेतल्यापासून रिक्षा चालकांना विनाकारण त्रास देण्याचे काम बने करत असल्याचा आरोप भाजपचे कल्याण जिल्हा वाहतूक सेल अध्यक्ष दत्ता माळेकर यांनी केला.
त्याबाबत शनिवारी त्यांनी वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहिले. ते म्हणाले की, बने हे एसी गाडीतून खाली उतरत नाहीत,आणि त्यांच्या गाडीच्या समोर एखादा रिक्षा चालक किंवा रिक्षा समोर आली तर त्या रिक्षा चालकाला गाडीतूनच फोटो काढून दंड मारण्याचे प्रकार ते करत आहेत. मालेकर यांच्या म्हणण्यानुसार शरद शिवाजी वाघ व अनिकेत ठाकूर या रिक्षा चालकांना त्याचा फटका बसला आहे.
मुळात बने यांनी डोंबिवली शहराची भौगोलिक परिस्थितीची माहिती घ्यावी आणि त्याद्वारे कारवाई करावी. तसेच राज्य शासनाने मुक्त परवाना धोरण सोडल्यामुळे भरमसाठ रिक्षा रोडवर आल्या, त्याचे नियोजन डोंबिवली वाहतूक शाखा कल्याण आरटीओ त्याचबरोबर महापालिकेने करणे गरजेचे होते ही त्यांची जबाबदारी आहे पण त्या यंत्रणा जबाबदारी ढकलत असल्याचे माळेकर म्हणाले.
शहरात अनेक ठिकाणी वाहतूक समस्या आहेत. कर्मचारी वेळेवर ड्युटीवर येत नाही त्यामुळे शहरात प्रत्येक चौका, चौकामध्ये वाहतूक कोंडी होते, त्याकडे लक्ष देण्याचे सोडून बने साहेब फक्त कारवाईच्या पाठी लागले आहेत आम्ही पॉईंटला कर्मचाऱ्यांची मागणी केली असता मनुष्यबळ कमी आहे असे सांगितले जाते. पण मनुष्यबळ दुसऱ्याच ठिकाणी व्यस्त असतात ते योग्य नाही अशी टीकाही त्यांनी केली. त्यासाठी सर्व यंत्रणानी एकत्र येऊन आधी नियोजन करावे, आम्ही रिक्षा लावायच्या कुठे हे त्यांनी सांगावे ? आणि नंतरच त्यांनी रिक्षा चालकांवर कारवाई करावी.
अधिकारी गाडीतूनच रिक्षा चालकांना पहिले ५०० आणि नंतरची १५०० रुपयांचा दंड अशी फोटोशूट करून फाईन मारत आहेत. त्यांच्या दबंगिरीला रिक्षाचालक कंटाळले असून रिक्षा चालकांनी तक्रारी रिक्षा संघटनेकडे केल्याचे सांगण्यात आले. डोंबिवली शहरासाठी दक्ष असा कर्मचारी डोंबिवली शहराला द्यावा, मनमानी कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या त्रासातून रिक्षा चालकांची सुटका करावी अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे.
मुळात फ्रंट सीट घेणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे, ती सुरू राहणार. माळेकर म्हणतात कारवाई करू नका तर तसे होणार नाही. नियम, शिस्त लावण्याचा तो प्रयत्न आहे. आता फलक लावून त्याबाबत जनजागृती देखील करण्यात येणार आहे : गिरीश बने, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा, डोंबिवली.