डाेंबिवली MIDC स्फोट प्रकरण: मलय, स्नेहाला न्यायालयीन कोठडी; अधिकाऱ्यांची होणार चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 08:46 AM2024-06-01T08:46:27+5:302024-06-01T08:50:15+5:30
न्यायालयाने पोलिसांची मागणी विचारात न घेता दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली, अशी माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली.
लाेकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: डाेंबिवली एमआयडीसीतील अमूदान कंपनीत स्फोट प्रकरणातील आरोपी मलय आणि स्नेहा मेहता या दोघांना शुक्रवारी कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या दोघांच्या न्यायालयीन कोठडीनंतर पोलिसांनी त्यांच्या तपासाची दिशा दुसरीकडे वळविली आहे. अमूदान कंपनीचे सेफ्टी ऑडिट केले होते की नाही? जर केले नसले तर संबंधित सरकारी यंत्रणांमधील अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात येणार आहे. ते जर दोषी आढळल्यास त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
कंपनीचा मालक मलय याला अटक केल्यावर त्याला प्रथम पाच दिवसांची त्यानंतर दोन दिवसांची अशी सात दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. मलयची पत्नी स्नेहा हिला घाटकोपर येथील घरातून अटक केली. स्नेहा यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती. मलय, स्नेहा या दोघांना कल्याण न्यायालयात हजर केले असता तपास कामी पोलिसांनी चार दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी केली. न्यायालयाने पोलिसांची मागणी विचारात न घेता दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली, अशी माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली.
मलय यांना मानसिक धक्का
या घटनेनंतर मलय यांनाही मानसिक धक्का बसल्याने त्यांनी फायर ऑडिटसाठी अर्ज कधी केला होता हेही आठवत नाही. या कंपनीचे औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाकडून सेफ्टी ऑडिट केले होते की नाही? याची विचारणा केली. संबंधित यंत्रणेकडून त्याचा अहवाल येत्या आठ दिवसात येणे अपेक्षित आहे. सेफ्टी ऑडिट केले नसल्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल, असे तपास अधिकारी कोळी यांनी सांगितले.