डोंबिवली एम.आय.डी.सी. औद्योगिक क्षेत्रातील रस्त्याच्या कामास प्रशासकीय मंजुरी प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 01:17 PM2021-01-27T13:17:24+5:302021-01-27T13:17:30+5:30
सदर भागातील औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांची लांबी २१.२८ किमी असून निवासी क्षेत्रातील रस्त्यांची लांबी १३.३८ किमी आहे.
कल्याण: खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदार संघातील कल्याणडोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली क्षेत्रातील एम.आय.डी.सी. औद्योगिक निवासी विभागातील रस्ते देखभाल व दुरुस्तीसाठी सन १९८९ मध्ये महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले होते. सदर भागातील औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांची लांबी २१.२८ किमी असून निवासी क्षेत्रातील रस्त्यांची लांबी १३.३८ किमी आहे. सदर रस्ते पूर्ण रुंदिकरणासाठी विकसित करण्यात आलेले नाहीत. तसेच रस्त्याच्या दुतर्फा गटार नसल्याने ते पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खराब होतात. त्यामुळे नागरिकांना व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत हि बाब खा.डॉ. शिंदे यांच्या निदर्शनास आली.
त्यास अनुसरून नागरी सुविधेच्या दृष्टीने औद्योगिक क्षेत्रातील रस्ते विकसित करावयाचे झाल्यास येणारा प्रकल्प खर्च क.डों.म.पा व म.औ.वि.म. यांचेमध्ये ५०-५० टक्के विभागातून करण्याबाबत महापालिकेमार्फत प्राथमिक सहमती कळविण्यात आली होती. यासंदर्भात विभागीय स्तरावर मा.मुख्य सचिव यांचेकडे म.औ.वि.म यांचेमार्फत ११०.३० कोटी खर्चाचा ढोबळ प्रस्ताव सदर करण्यात आला होता. त्यानंतर मऔविमच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात संयुक्त बैठक घेण्यात येऊन त्यात निवासी क्षेत्रातील १३.३८ किमी लांब रस्त्याचे कॉंक्रीटीकरण क.डों.म.पा ने करावे (खर्च अंदाजे रक्कम रु.५२.९३ कोटी) व औद्योगिक क्षेत्रातील ११.०१५ किमी लांब रस्त्याचे कॉंक्रीटीकरण मऔविमने करावे. (खर्च अंदाजे रक्कम रु.५७.३७ कोटी) असा प्राथमिक निर्णय घेण्यात आला.
कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे तसेच याबाबत करावयात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाय योजनेमुळे महानगरपालिकेवर मोठा ताण असून वरीलप्रमाणे रस्ते विकसित करण्यासाठी अनुदान स्वरुपात निधी प्राप्त होणे आवश्यक असल्याची माहिती खासदार डॉ. शिंदे यांनी तत्काळ नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले व स्वतः यासाठी वारंवार पाठपुरावा करीत असून त्यास अखेर यश प्राप्त झाले आहे.
त्यास सकारात्मक प्रतिसाद म्हणून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत विस्तारित नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील रस्ते क.डों.म.पा. व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचेमार्फत सयुंक्तपणे विकसित करण्याचा कामास प्रशासकीय मंजुरी देऊन एकूण अंदाजित रक्कम रु. ११०.३० कोटी पैकी ५०% अनुदान रक्कम ५७.३७ कोटी अर्थसहाय्य अनुदान स्वरुपात कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेला वितरीत करण्याचे आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचेमार्फत महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांना देण्यात आले आहे. याबद्दल महापालिका व खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांचेवतीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व एम.एम.आर.डी.ए. व सर्व संबधीत प्रशासन अधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.