डोंबिवली MIDC परिसरात पुन्हा स्फोट, फेज-२ मध्ये धुराचे लोट; सुदैवाने जीवितहानी नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 15:51 IST2024-07-07T15:51:31+5:302024-07-07T15:51:54+5:30
Dombivli MIDC Blast: डोंबिवलीतील सोनार पाडा MIDC मध्ये हा प्रकार घडला असून सर्व जण सुखरुप असल्याची प्राथमिक माहिती

डोंबिवली MIDC परिसरात पुन्हा स्फोट, फेज-२ मध्ये धुराचे लोट; सुदैवाने जीवितहानी नाही!
Dombivli MIDC Blast: डोंबिवलीमध्ये रविवारी दुपारी पुन्हा एकदा भीषण स्फोट झाल्याचा प्रकार घडला. MIDC परिसरात स्फोट झाल्याने डोंबिवली पुन्हा हादरली. फेज-२मधील एका कंपनीत हा स्फोट झाल्याने मोठी आग लागली आणि परिसरात धुराचे लोट पसरल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळाल्यावर आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या लगेचच घटनास्थळी दाखल झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. डोंबिवलीतील सोनार पाडा MIDC मध्ये हा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीच्या एमआयडीसी फेज-२मधील न्यू अग्रो केमिकल या कंपनीत स्फोट झाला आणि आग लागली. या कंपनीत कापडावर प्रिटींग करण्यासाठी लागणारे केमिकल बनवण्याचे काम केले जाते. दोन स्फोट झाल्यानंतर आग लागली आणि धुराचे लोट पाहून परिसरात नागरिकांनी याबाबत संबंधितांना माहिती दिली. दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. इलेक्ट्रिक पार्किंगमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ज्या ठिकाणी आग लागली, त्या ठिकाणी काही कामगार होते. परंतु ते सर्व जण तेथून सुखरुप बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
काही दिवसांपूर्वीच डोंबिवली एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला होता. त्यात १२ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी कंपनीचे मालक आणि व्यवस्थापक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला होता. असे असूनही या घटनांना आळा घालणे प्रशासनाला अद्याप शक्य झालेले नसल्याचे चित्र आहे.