डोंबिवली रेल्वे स्थानक झाले डम्पिंग ग्राऊंड; KDMC नं उचललं कठोर पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 08:04 PM2021-11-17T20:04:11+5:302021-11-17T20:04:31+5:30
कचऱ्याचा अधिभार ठेकेदाराकडून वसूल करणार
कल्याण - डोंबिवली रेल्वे स्थानकात मंगळवारी ब्रीज खाली असलेल्या कच-याला आग लागली होती. ऐन गर्दीच्या वेळी ही आग लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होत. याअगोदरही कच-यामुळे आग लागल्याचे प्रकार झाले आहेत. रेल्वे स्थानकातील प्लटफॉर्म क्रमांक एक खाली मोठ्या प्रमाणावर कचरा साठवला जात आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन डम्पिंग ग्राऊंड होते की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या कच-याची आज महापालिका उपायुक्त रामदास कोकरे यांनी पाहणी केली. आतापर्यंतच्या कचऱ्याचा अधिभार ठेकेदाराकडून वसूल करणार असंही कोकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी, दुकानदार, फेरीवाले, स्टॉलधारक यांच्यामुळे तयार होणारा कचरा गोळा करून हा कचरा रेल्वेच्या पादचारी पुलाखाली गोळा केला जातो. महिनाभरापासून हा कचरा उचलण्यात आला अचानक या साचलेल्या ढिगाला आग लागली. या कचऱ्याला वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असल्याने स्थानकाच्या सुरक्षेसह प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.हा कचरा उचलण्याची जबाबदारी महापालिकेची नसल्याचं सांगत स्वच्छतेसाठी रेल्वे प्रशासनाने या कच-याची सुका आणि ओला अशी विगतवारी करत विल्हेवाट लावावी अशा सूचना संबंधित रेल्वेच्या ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत. तसेच आतापर्यत महापालिकेने रेल्वे प्रशासनाच्या हद्दीतून किती कचरा उचलला आहे याची माहिती घेत त्याचा अधिभार ठेकेदाराकडून वसूल केला जाणार असल्याचा इशारा देखील दिला आहे.तर स्टेशन परिसरातील अस्वच्छतेमुळे शहराची प्रतिमा मलीन होत असून अस्वच्छता खपवून घेणार नसल्याची तंबी देखील ठेकेदाराला देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या दिवसात ठेकेदाराकडून कोणती भूमिका घेतली जाते? ते पहावं लागेल. तसेच एखादी मोठी दुर्घटना झाल्यावरचं रेल्वे प्रशासनाला जाग येईल का? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.