डोंबिवली : ढगांचा गडगडाट, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी
By अनिकेत घमंडी | Published: September 7, 2022 05:20 PM2022-09-07T17:20:02+5:302022-09-07T17:23:19+5:30
उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना थोडासा दिलासा मिळाला.
डोंबिवली: शहरात दोन दिवसांपासून प्रचंड उकाडा वाढलेला असतानाच बुधवारी संध्याकाळी ४ नंतर ढगांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काही क्षणात वातावरणात गारवा पसरला.
ढगांचा गडगडाट आणि विजा चमकल्याने रस्तावरील नागरिकांची आडोसा घेण्यासाठी धावपळ झाली. पावसाची जोरदार सर आल्याने व्यावसायिक, फेरीवाले आदींची पंचाईत झाली. दिवसभर ऊन पडले होते, काही वेळातच आकाशात काळे ढग आले असून जोरदार पावसाला सुरुवात झाली.
शाळेतून घरी येणाऱ्या विद्यार्थ्यांचीही देखील या अचानक आलेल्या पावसामुळे पंचाईत झाली. दप्तर भिजू नये म्हणून काहींनी दुकानाबाहेरच्या शेडचा आधार घेतला, दुचाकी स्वारांना वाहने थांबवून मिळेल तिथे उभे रहावे लागल्याचे निदर्शनास आले. काही मिनिटात उकाड्याची जागा गारव्याने घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.
विजा चमकायला लागल्याने शहरातील इंटरनेट सेवा देणाऱ्या काही खासगी व्यावसायिकांनी सुरक्षेच्या कारणाने सेवा काही वेळ बंद ठेवली. त्याबाबत त्यांनी ग्राहकांना सूचित केले आणि सेवा सुरळीत कधी होईल याबाबतचे संदेशही पाठवण्यात आले. सध्या पावसाचा जोर कमी झाल्याने पाऊण तासानंतर इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली.