डोंबिवली ते लडाख: एक बंधन, रक्षाबंधन' संकल्पनेतून युवकाची लाखो जवानांसाठी राखी भेट
By अनिकेत घमंडी | Published: July 17, 2024 08:50 PM2024-07-17T20:50:11+5:302024-07-17T20:50:49+5:30
प्रत्येक राज्यात राख्या संकलन करण्याचा 'वे टू कॉज फाऊंडेशन'चा संकल्प सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ
अनिकेत घमंडी, डोंबिवली: भारतीय सैन्यदलातील आपले शूरवीर जवान भारतमातेचे अहोरात्र संरक्षण करतात. त्या बांधवांप्रति आपल्या सर्वांच्याच मनात एक आपुलकीचे बंधन जपण्यासाठी डोंबिवलीतील रोहित आचरेकर याने वे टू कॉज फाऊंडेशन आणि वे टू कॉज रायडर्स क्लबच्या माध्यमातून एक बंधन, रक्षाबंधन या संकल्पनेतून लाखो सैनिकांना राख्या पोहोचवण्याचा संकल्प सोडला. त्यासाठी तो डोंबिवली ते लडाख मोटार सायकलने निघाला असून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी त्याच्या उपक्रमाला हिरवा झेंडा दाखवला.
कारगिल युद्धातील भारताच्या विजयाला यावर्षी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने वे टू कॉज फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रोहितच्या नेतृत्वात १७ जुलै ते १९ ऑगस्ट दरम्यान डोंबिवली ते लडाख प्रांतातील कारगिल वॉर मेमोरियल अशी बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे. यंदा हा उपक्रम डोंबिवलीकर सांस्कृतिक परिवाराच्या माध्यमातून होत असल्याचे त्याने जाहीर।केले. गेल्या १८ वर्षांपासून ' यांनी उपक्रम राबवत आहे. डोंबिवली पश्चिम येथील स्टेशन रोड परिसरात ७७ स्क्वेअर फूट ध्वज फडकवून उपक्रमाचा शुभारंभ केला.
त्या उपक्रमाअंतर्गत दरवर्षीप्रमाणे यंदाही भारताचा स्वातंत्र्यदिन आणि त्यानंतर येणारे रक्षाबंधन सैनिकांसोबत साजरा करण्यात येणार आहे. यावर्षीच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून अखंड भारतातील प्रत्येक राज्यात ७७ स्क्वेअर फूट ध्वज फडकवण्याचा वे टू कॉज फाऊंडेशनचा संकल्प आहे.तर स्वातंत्र्यदिनी लडाख येथे ७७ फूटचा ध्वज फडकवण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक राज्यातून सैनिकांसाठी राख्या गोळा करण्यात येणार आहेत. यासाठीचे संपूर्ण नियोजन रोहित यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले आहे. देशभक्ती आणि आपुलकी जागवणारा हा उपक्रम कौतुकास्पद असून हा उपक्रम वर्षानुवर्षे असाच सुरू रहावा, असे म्हणत या उपक्रमाला डोंबिवलीकरांनी शुभेच्छा दिल्या.