डोंबिवलीचा श्वास असलेल्या उंबार्ली टेकडीवर घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 02:59 PM2021-01-02T14:59:42+5:302021-01-02T15:04:46+5:30
Dombivali News : पर्यावरणाने समृद्ध असलेली टेकडी तोडून घरे उभारण्यात काय अर्थ असा संतप्त सवाल मनसेच्या वतीने उपस्थित केला आहे
कल्याण - डोंबिवली नजीक असलेली उंबार्ली टेकडी ही शहराच्या श्वास आहे. या टेकडीला पोखरुन त्याठिकाणी म्हाडाच्या वतीने केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेतील घरकूल सुरू आहे. पर्यावरणाने समृद्ध असलेली टेकडी तोडून घरे उभारण्यात काय अर्थ असा संतप्त सवाल मनसेच्या वतीने उपस्थित केला आहे. या प्रकल्पाला स्थगिती देण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. येत्या ५ जानेवारी रोजी या ठिकाणी मनसेच्या वतीने आंदोलन केले जाणार आहे.
मनसेचे राजेश कदम यांनी सांगितले की, उंबार्ली टेकडीवर एकूण ४० हजार वृक्ष लागवड आहे. ही वृक्ष लागवड वनखाते, स्थानिक भूमीपूत्र, पक्षी निसर्ग प्रेमींकडून करण्यात आली आहे. या टेकडीवर नागरीक फेरफटका मारायला जातात. त्याठिकाणी वन प्रेमींकडून झाडांना पाणी घातले जाते. या टेकडीला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भेट दिली होती. टेकडी परिसराचा फेरफटका मारुन या टेकडीवरील वनराईचे जतन करण्यात येणार आहे. तसेच ठीबक पद्धतीने या झाडांना पाणी देण्याचा विचार समोर आला. त्याचबरोबर या टेकडीवर नाशिकच्या धर्तीवर बॉटीनिकल गार्डन उभारण्याचा मानस पाटील यांनी व्यक्त केला होता.
म्हाडाच्या वतीने या टेकडीनजिक पंतप्रधान आवास योजनेतील घरे बांधली जात आहे. टेकडीचा डोंगर पोखरला जात आहे. टेकडीला धोका निर्माण झाला आहे. या प्रकल्पास स्थगिती देण्यात यावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. युती सरकारच्या काळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी डोंगर टेकडय़ा पोखरुन दगड माती काढू नये असे आदेश दिले होते. सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आहेत. त्यांच्याकडून म्हाडातर्फे टेकडी पोखरण्याचे सुरू असलेल्या काम दुर्लक्षित आहे. उंबार्ली टेकडी वाचविण्यासाठी आरेच्या धर्तीवर मनसे आंदोलन करणार असल्याचा इशारा कदम यांनी दिला आहे.