डोंबिवलीकर खूप प्रेमळ; माझ्या आमदार, खासदारांवरही त्यांचे तेवढेच प्रेम - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By अनिकेत घमंडी | Published: March 22, 2023 05:06 PM2023-03-22T17:06:49+5:302023-03-22T17:14:20+5:30
"मुळातच डोंबिवलीकर हे खूप प्रेमळ असून माझ्या आमदार, खासदारांवर देखील त्यांचे तेवढेच प्रेम आहे, मला इथे आलो की आनंद मिळतो."
डोंबिवली - गुढीपाडव्यनिमित्त हिंदूनववर्षं स्वागत यात्रेची संकल्पना सातासमुद्रापार नेणारे डोंबिवली हे शहर असून यंदा या यात्रेचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. मुळातच डोंबिवलीकर हे खूप प्रेमळ असून माझ्या आमदार, खासदारांवर देखील त्यांचे तेवढेच प्रेम आहे, मला इथे आलो की आनंद मिळतो. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डोंबिवलीच्या जल्लोषात सहभागी झाले.
स्वागतयात्रेला बुधवारी नेहमीप्रमाणे पारंपरिक प्रथेनुसार शुभारंभ झाला, सांस्कृतिक नगरीत ढोल ताशांच्या गजरात पश्चिमेकडून मिरवणूक निघाली आणि त्यानंतर हळूहळू पुढे आली, त्यामध्ये पूर्वेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले, त्यादरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील हे देखील यात्रेत सहभागी होऊन नागरिकांना शुभेच्छा देत होते. मंदिरात गेल्यानंतर शिंदे यांनी मान्यवरांसह श्रीगणेशाचे दर्शन घेतले आणि व्यासपीठावर आले. त्यावेळी त्यांच्या मनोगतात त्यांनी कोणतेही राजकीय भाषण करण्याची ही जागा नाही, वेळ नाही, त्यामुळे त्यावर न बोलता आगामी काळातही अशाच जल्लोषात उत्सव साजरे करूया.
कोरोना काळात आपण सगळे घरात बसून उत्सव करत होतो. आता मात्र जाहीरपणे ते करायला लागलो आहोत हा सकारात्मक बदल आपल्या सरकारने करून दिला हे यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवे असेही ते म्हणाले. त्यावेळी व्यासपीठावर संस्थानाच्या अध्यक्षा अलका मुतालिक, उपाध्यक्ष सुहास आंबेकर, वैद्य विनय वेलणकर, माजी अध्यक्ष राहुल दामले, श्रीपाद कुलकर्णी, प्रविण दुधे, माजी आर्मी ऑफिसर (शिफु) शौर्य भारद्वज , सिनेअभिनेते अंकुश चौधरी, दिगदर्शक केदार शिंदे उपस्थित होते.
मंदिराच्या सुशोभीकरण विषयात कळसासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ११ लाख रुपयांची देणगी देणार असल्याचे दुधे यांनी जाहीर केले, त्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत, जय श्रीराम, गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा दिल्या. अलका मुतालिक यांनी प्रास्ताविक केले.
श्री गणेश मंदिर संस्थान मे महिन्यापासून पुढे शतक महोत्सव साजरे करणार आहे, त्या मंदिराच्या सुशोभीकरण मोहिमेत जेवढे काही मंदिर व्यवस्थापनाला अपेक्षित आहे त्याहीपेक्षा जास्त सहकार्य केले जाईल असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही त्यांच्या मनोगतात रा स्व संघाने हे रोपटे लावले, आता त्याला आकार येत असून त्याचा वटवृक्ष होत आहे. आपण सगळे त्याचे साक्षीदार आहोत, संघाने समाजासाठी दिलेलं प्रत्येक समाजकार्य केवढे मोठे असते, त्यामागचा विचार केवढा मोठा असतो हे यानिमित्ताने सिद्ध झाले. संघाच्या विचारांवर चिरंतन वाटचाल करून जो हिंदु हित की बात करेगा वही देश पे राज करे गा... असा नारा देऊन भारत माता की जय च्या घोषणा देऊन चव्हाण यांनी भाषणाचा समारोप केला.