डोंबिवलीकर न्यू फोर्स अकॅडमीचे उद्घाटन: तरुणाईला विनामूल्य पोलीस, सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण
By अनिकेत घमंडी | Published: February 10, 2024 04:52 PM2024-02-10T16:52:17+5:302024-02-10T16:53:27+5:30
मंत्री रवींद्र चव्हाण यांची संकल्पना
अनिकेत घमंडी, डोंबिवली: अंगावर खाकी वर्दी असावी असं अनेक तरुणांचं ध्येय असतं. भारतीय सैन्य, महाराष्ट्र पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल, रेल्वे सुरक्षा बल, सीमा सुरक्षा बल, विशेष राखीव पोलीस दल अशा विविध सुरक्षा यंत्रणांमध्ये सतत भरती प्रक्रिया सुरूच असते. वर्दीत राहून करियर घडावं हे स्वप्न उराशी बाळगणारे अनेक देशभक्त युवा आपल्या डोंबिवली परिसरात आहेत. त्या तरुणांना मैदानी खेळ आणि लेखी परीक्षा यांचे परिपूर्ण पूर्व प्रशिक्षण मिळाले पाहिजे.
यासाठी डोंबिवलीकर प्रतिष्ठानच्या पुढाकारातून स्थापन करण्यात आलेली डोंबिवलीकर न्यू फोर्स अकॅडमी शनिवारपासून सुरू झाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतुन सुरू झालेल्या त्या अकॅडमीत इयत्ता ७वी पासूनच्या विद्यार्थ्यांना सैन्य आणि पोलीस दलातील भरतीसाठी परिपूर्ण आणि महत्त्वाचं म्हणजे विनामूल्य प्रशिक्षण मिळेल. खंबालपाडा ९० फिट येथील मैदानात त्या मैदानी खेळांची तर ठाण्याच्या प्रवीण अकॅडमीचे प्रवीण भास्कर मेस्त्री यांच्यासारखे अत्यंत अनुभवी प्रशिक्षक लेखी पेपरची पूर्वतयारी करून घेणार आहेत.
त्याच बरोबर लेक्चर्सची आणि अभ्यासिकेची सोय देखील उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे चव्हाण म्हणाले. शालेय जीवनापासूनच सैन्य आणि पोलीस भरतीसाठी परिपूर्ण प्रशिक्षण मिळाले तर उद्याची संस्कारी पिढी देशकार्यात सामील होऊन बलशाली भारत घडवेल, असा विश्वास या अकॅडमीचा उद् घाटन समारंभात उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रशिक्षकांनी व्यक्त केला.