डोंबिवलीकर विद्यार्थ्यांचे देशप्रेम: आसाम रेजिमेंटच्या २६०० जवानांना राख्या पाठवल्या
By अनिकेत घमंडी | Published: August 6, 2022 02:15 PM2022-08-06T14:15:07+5:302022-08-06T14:15:51+5:30
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टच्या १६ इंटरॅक्ट क्लबचा उपक्रम
डोंबिवली: आपला देश यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. त्यानिमित्ताने देशाच्या सुरक्षेमध्ये सैनिकांच्या अपूर्व योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधून रोटरी क्लब डोंबिवलीच्या १६ इंटरॅक्ट क्लबने शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सुमारे २६०० राख्या संकलित करून आसाम रेजिमेंटच्या जवानांना भेट म्हणून पाठवण्यात आल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ डोंबिवली इस्टचे अद्यक्ष विजय डुंबरे यांनी शनिवारी दिली.
या प्रकल्पात होली एंजल स्कूलने ८००, मॉडेल स्कूलने ३३० , पवार पब्लिक स्कूलने ३५०, ओमकार स्कूलने २९७, ग्रींस इंग्लिश स्कूलने २१५ , शिवाई बालक मंदिर २००, एस व्ही जोशी हायस्कूलने १००, आणि न्यू सनराइज हायस्कूलने ५०० राख्या अशा पद्धतीने शाळेच्या विद्यार्थ्यांनी या प्रकल्पासाठी सिंहाचा वाटा उचलला. त्यामुळे हजारो राख्यांचे संकलन करणे शक्य झाल्याचे समाधान क्लबच्या वतीने व्यक्त करण्यात आले.
या शाळेतील सर्व शिक्षकांनी मुलांकडून हा उपक्रम आवर्जून करून देशप्रेम जागृत ठेवण्याचे कार्य केले. मुलांनीही प्रथम घटक चाचणी परीक्षेचा ताण असूनही वेळेत जवानांसाठी राख्या उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल त्यांचे डुंबरे यांनी कौतुक केले. तसेच त्या उपक्रमात रो.समिक्षा सानप, रो.आरती मनसुख, रो.वर्षा पाटील, रो.गणेश जगदिशन, व रो.चक्रपाणी शुक्ला यांनी सहकार्य केले. सुषमा गरिबे यांनी या उपक्रमात मोलाचे योगदान दिल्याचे सांगण्यात आले.