डोंबिवलीकरांना पावसाने झोडपले, नागरिकांची तारांबळ
By अनिकेत घमंडी | Published: September 27, 2023 05:24 PM2023-09-27T17:24:27+5:302023-09-27T17:24:37+5:30
घामाच्या धारा आणि सहन न होणाऱ्या उष्मामुळे नागरिकांनी बाजारात आल्यावर मिळेल तिथे आडोसा घेतला.
डोंबिवली: दिवसा ऊन अन रात्री पाऊस असा प्रत्यय डोंबिवलीकर नागरिकांना बुधवारी आला. सलग दोन दिवस नागरिकांची ऐन संध्याकाळी घरी परतण्याचा वेळेस भरपूर पंचाईत झाली. दिवसभर कडक उन्हाने नागरिक त्रस्त झाले होते, घामाच्या धारा आणि सहन न होणाऱ्या उष्मामुळे नागरिकांनी बाजारात आल्यावर मिळेल तिथे आडोसा घेतला.
काही वेळ विजा चमकल्या, ढगांचा गडगडाट सुरू होता. चार वाजता पडलेल्या पावसामुळे संध्याकाळी याउलट चित्र होते, अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली. बस, रिक्षा न मिळाल्याने नागरिकांचे हाल झाले. अनेकांना केळकर पथ, इंदिरा गांधी चौक आदी सर्वत्र वाट बघावी लागली, पण बराच वेळ रिक्षा मिळाली नाही. पावसापासून।वाचण्यासाठी अनेकांनी स्कायवॉकखाली उभे राहून आडोसा घेतला. ऊन पावसाच्या या खेळामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली होती. काही मार्गावर पावसामुळे स्कुल बसमध्ये मुले बसून होती. संध्याकाळी ५ च्या सुमारास पावसाचा वेग कमी झाला असला तरी सरींवरसरी बरसल्या, त्यामुळे काही वेळ वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
नांदीवली भागात एक झाड उन्मळून पडल्याची घटना घडली, अर्धा तास झाला तरी मनपाचे कर्मचारी येऊ शकले नव्हते, त्यामुळे वाहतुक कोंडीची होण्याची शक्यता व्यक्त झाली.