डोंबवलकरांचा नागरी अभिवादन सोहळा; ४७ संस्थांच्या एकत्रित सहभागातून कौतुकाची थाप
By अनिकेत घमंडी | Published: February 20, 2023 02:52 PM2023-02-20T14:52:09+5:302023-02-20T14:53:21+5:30
कुष्ठरोगी वसाहतीत काम करणाऱ्या गजानन माने यांचा पद्मश्री सन्मान मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला
डोंबिवली : नागरी अभिवादन न्यास ह्या डोंबिवलीतील ४७ संस्थांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या शिखर संस्थेतर्फे नागरी अभिवादन सोहळा २०२३ टिळकनगर शाळेच्या भव्य पटांगणात शेकडो प्रेक्षकांच्या साक्षीने रविवारी संपन्न झाला. ज्येष्ठ नागरी सन्मान डॉ. अंजली आपटे ( दिव्यांग सेवा ), श्रीकांत पावगी ( शैक्षणिक आणि पत्रकारिता), सुरेश फाटक ( वनवासी सेवा ) व सुभाष मुंदडा ( ग्रंथालय संचालन )ह्यांना प्रदान करण्यात आला. तर युवाचैतन्य सन्मान राही पाखले ( क्रिडा क्षेत्रात भरीव कामगिरी), अमोल पोतदार ( शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील शैक्षणिक क्षेत्रात योगदान ), रुपाली शाईवाले (पर्यावरण दक्षता मंचामार्फत अमूल्य योगदान ) आदींना प्रदान करण्यात आला. विवेकानंद सेवा मंडळाला संस्था पुरस्कार (त्यांच्या विहिगाव परिसरातील भरीव कार्यासाठी व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी भरीव कार्यासाठी) देण्यात आला.
कुष्ठरोगी वसाहतीत काम करणाऱ्या गजानन माने यांचा पद्मश्री सन्मान मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. डोंबिवलीकर एक परिवाराच्या प्रभू कापसे यांनी तयार केलेली सन्मान चिन्हे देवून सर्वांना गौरविण्यात आले. कौस्तुभ कुलकर्णी यांनी सुरेख ध्वनी चित्रफीतीद्वारे सर्व सत्कार मूर्तींचा जीवनपट उलगडला. कार्यक्रम अध्यक्षपद अलका मुतालिक ह्यांनी भूषविले.काही काळ डोंबिवलीत वास्तव्य केलेले व यावर्षी पद्मश्री पुरस्कार मिळालेले रमेश पतंगे हे प्रमुख पाहुणे होते. व्यासपीठावर न्यासाचे पदाधिकारी सुधीर जोगळेकर, माधव जोशी, प्रवीण दुधे, जयंत फलके उपस्थित होते. प्रारंभी शिवप्रतिमेची ओंकार शाळेच्या लेझिम पथकासह पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. अत्यंत दिमाखदार आणि सुनियोजित कार्यक्रमाच्या निवेदनाची धुरा रिद्धी करकरे हिने समर्थपणे पेलली. समारंभास गेल्या सात वर्षांतील अनेक सन्मानमूर्ती उपस्थित होते.